चंद्रशेखर बावनकुळे : कोराडी येथे पोलीस पाटलांचा मेळावाकोराडी : ब्रिटिश काळापासून पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पोलीस यंत्रणा व शासन यांच्यासाठी पोलीस पाटलांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक धर्माच्या सांस्कृतिक रचनेप्रमाणे गावात सर्वाना न्याय देण्याचे व सलोखा निर्माण करण्याचे काम पोलीस पाटलांनी केले. त्यामुळे पोलीस पाटलांनी गुन्हेमुक्त समाजासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विदर्भ पोलीस पाटील संघटनेच्यावतीने कोराडी येथे सोमवारी पोलीस पाटलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उद्घाटक म्हणून पालकंत्री बावनकुळे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय मैंद, मदन राजूरकर, सूर्यभान मोरे, अरविंद खोबे, मोतीराम पवार, दीपक पालीवाल आदी उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, गावात पोलीस पाटलांमुळे अनेक गुन्हे नियंत्रणात आले आहेत. पोलीस पाटील हे पोल्ीास विभागाचे अत्यंत विश्वसनीय सूत्र आहेत. त्यांचा सन्मान आजही आहे. पण २१ व्या शतकात सर्वच पदांवर जबाबदारी आली आहे. जो जबाबदारीने काम करतो, त्याचे काम लक्षात राहते. त्यांच्या साडेसात हजार रुपये मानधन आणि निवृत्तीनंतर अर्धे मानधन या दोन्ही मागण्या आपण शासन दरबारी लावून धरणार आहे. यापूवीर्ही आम्ही पोलीस पाटलांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडल्या आहेत. सरकारची याबाबत सकारात्मक भूमिका आहे. अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांच्या प्रलंबित असलेल्या नियुक्त्या सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी उमेश चौबे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अध्यक्ष दीपक पालीवाल यांनी केले. कार्यक्रमाला विविध गावांमधील पोलीस पाटलांनी हजेरी लावली होती. (प्रतिनिधी)
पोलीस पाटलांनी सहकार्य करावे
By admin | Published: May 24, 2016 2:49 AM