लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणाल तर दुसरा जन्म आणि हा क्षण संस्मरणीय ठरविण्यासाठीची धडपड प्रत्येकाचीच असते. यात महत्त्वाचा भाग असतो तो फोटोग्राफरचा. विवाहसोहळ्यात हा अत्यंत महत्त्वाचा घटक. फोटोग्राफरकडे असलेला कॅमेरा हे असे गॅझेज आहे, ज्यातून तत्कालीन प्रसंगात टिपलेली क्षणचित्रे वर्तमानातून भुतकाळात डोकावण्यास बाध्य करतात.
अवजड कॅमेराभोवती असलेल्या कापडात शिरून फोटो क्लिक करणाऱ्या काळापासून ते रोल कॅमेरा, डिजिटल कॅमेराचा आणि हल्ली मोबाइल कॅमेराचा युग सर्वांनी बघितला. त्याला जोड म्हणून आता उडते अर्थात ड्रोन कॅमेरेही अवतरले आणि चित्रीकरणाच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती आली. मात्र, ड्रोन कॅमेरे वापरताना वैश्विकरणाच्या काळात प्रचंड सजगता बाळगणे महत्त्वाचे ठरले. त्यामुळे, सुरक्षा यंत्रणाही सजग झाल्या आणि विवाह सोहळ्यांची म्हणा व अन्य कोणत्याही उपक्रमाचे चित्रीकरण ड्रोन द्वारे करायचे असेल तर पोलीस परवानगी महत्त्वाची ठरत आहे.
पोलीस ठाण्यात करावा अर्ज
विवाह सोहळा म्हणा वा प्री-वेडिंग शुट किंवा अन्य कोणतेही उपक्रम, यांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करताना पोलीस परवानगी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी ड्रोनद्वारे चित्रीकरण करायचे असेल, त्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यात विधिवत अर्ज करावा लागतो. अर्जामध्ये चित्रीकरणाची तारीख, स्थळ आणि चित्रीकरण कशाचे करायचे (विवाह, प्री-वेडिंग वा अन्य), ते किती वेळ करायचे, त्यात सहभागी कुटुंब वा अन्य आदींची माहिती सादर करावी लागते. विशेष म्हणजे, यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. दुसरे कुठले व्यावसायिक उपक्रम असतील तर त्यानुसार शुल्काची परिभाषा वेगळी आहे. पोलीस ठाण्याकडून परवानगी सहज आणि तत्काळ दिली जाते.
कारवाई टाळण्यासाठी परवानगी महत्त्वाची वर्तमानकाळात होत असलेल्या घडामोडी म्हणा व सुरक्षेचे महत्त्व, याबाबत नागरिकही सुजाण झाले आहेत. ड्रोन कॅमेरा हवेत असतो आणि त्यामुळे, लोकांच्या दृष्टीस केवळ तोच येतो. बरेचदा अतिमहत्त्वाच्या स्थळांशेजारी, जसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल व रेशिमबाग येथील कार्यालय, विमानतळ, दीक्षाभूमी, रेल्वे स्टेशन, बसस्टेशन आदी स्थळांभोवती ड्रोन गिरक्या खातांना दिसला की लोक अलर्ट मोडमध्ये जातात. तेव्हा ते तत्काळ पोलिसांत तक्रार करतात किंवा शंका व्यक्त करतात. अशावेळी पोलीस कारवाई करतात. रितसर परवानगी असली तर कारवाई टाळता येते. म्हणून कारवाई टाळण्यासाठी परवानगी महत्त्वाची असल्याचे मत शहरातील विविध पोलीस ठाण्यातील अटेंडन्टनी दिली.
ड्रोन उडविण्याचे परवाने मोजक्याच फोटोग्राफरकडे
शहरात हजाराच्या वर नामांकित फोटो स्टुडीओज आहेत. शिवाय, या क्षेत्रात करिअर करणारे दररोज नवे फोटोग्राफर उतरत आहेत. त्या प्रत्येकाजवळ गोमास्ता किंवा उद्यम आधार कार्ड आहेत. मात्र, ड्रोन उडविण्याचे परवाने काही मोजक्याच फोटोग्राफरकडे आहेत. त्यात डाॅक्युमेंटरी मेकर, चित्रपटांचे चित्रीकरण करणारे आणि काही मोठ्या स्टुडिओजचा समावेश आहे. शहरात विवाह किंवा प्री-वेडिंगसाठी ड्रोनचा वापर करणाऱ्यांना परवान्याची अट शिथिल आहे.
१५ ते ५० हजार रुपये चार्ज
विवाह सोहळ्याचे स्वरूप, प्री-वेडिंगचे स्वरूप यावर ड्रोन कॅमेरा शुटिंगचे चार्ज निश्चित होतात. प्री-वेडिंगचे शुटिंग चित्रपटाच्या शुटिंगप्रमाणे असते. शिवाय, आपले हे क्षण आकर्षक असावे, असे प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यानुसार १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत चार्जेच घेतले जातात. परवानगीसाठीही कसरत करावी लागत नाही. पोलीस सुरक्षेचे नियम सांगतात आणि हमीपत्र घेऊन परवानगी देतात.
-जीवक गजभिये, फोटोग्राफर
..................