योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी अमित साहू याच्याकडून पोलिसांना हवे तसे सहकार्य होत नसल्याचे चित्र आहे. त्याच्याकडून सत्य बाहेर काढण्यासाठी लाय डिटेक्टर टेस्ट किंवा पॉलिग्राफ चाचणीची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेता नागपूर पोलिसांनी याबाबत कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाकडे या चाचण्यांबाबत परवानगी मागण्यात येणार आहे. दरम्यान, अमित साहू याच्या आईच्या घरातून पोलिसांना एक मोबाईल व लॅपटॉप सापडला आहे. संबंधित मोबाईल सना खान यांचा आहे का याची सायबर तज्ज्ञांकंडून चाचपणी करण्यात येत आहे.
ऑगस्ट महिन्यात अमित साहूने पैशांच्या वादातून सना खान यांची जबलपूर येथील निवासस्थानी हत्या केली होती व त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शव हिरन नदीत फेकले होते. पोलिसांनी बरेच दिवस शोधमोहीम राबवली, मात्र सना खान यांच्या मृतदेह सापडला नाही. आरोपींनी सना खान यांचा मोबाईलदेखील नदीत फेकल्याचा दावा केला होता. पोलिसांना मोबाईलदेखील आढळला नव्हता. दरम्यान, अमित साहूच्या आईच्या घरी तपासणी केली असता तेथे एक मोबाईल व लॅपटॉप आढळला आहे. हा मोबाईल व लॅपटॉप अमितने तेथे नेऊन ठेवला होता. आता तो मोबाईल सना खान यांचा तर नाही, तसेच लॅपटॉपमध्ये नेमके काय आहे याचा शोध सायबर तज्ज्ञांच्या मदतीने घेण्यात येत आहे. संबंधित मोबाईलवर कुणाचा फोन आला होता, त्यातून कुणाला फोन करण्यात आला होता किंवा कोणते सीमकार्ड त्या मोबाईलवर वापरण्यात आले होते, इत्यादींचा शोधदेखील आयएमईआय क्रमांकाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. जर मोबाईलमध्ये काही डेटा आढळला तर तो या प्रकरणातील मोठा पुरावा ठरू शकेल.
- पोलिसांकडून अमितची चौकशी सुरू
अमितविरोधात नागपूर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर त्याला ताब्यात घेतले व ३० डिसेंबरपासून त्याची चौकशी सुरू होती. त्याच्या मूळ घराचा पत्ता त्याच्या चौकशीतून मिळाला. तेथे त्याची आई राहते. तेथेच मोबाईल व लॅपटॉप आढळले.
- न्यायालयाच्या परवानगीकडे पोलिसांचे लक्ष
पॉलिग्राफ टेस्ट व लाय डिटेक्टर टेस्टसाठी पोलिसांकडून न्यायालयात परत अर्ज करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या परवानगीच्या आधारावरच पोलिसांकडून पुढील पावले उचलण्यात येतील, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी स्पष्ट केले.