लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदानमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या महिलांकडे पोलिसांनी छापा घालून दोघींना अटक केली. कविता योगिराज टेंभुर्णे (वय ५०, रा. टीव्ही टॉवरजवळ) तसेच सुनीता सुनील इंगळे (वय ४०, रा. हजारीपहाड) अशी या दोघींची नावे आहेत.
आरोपी महिला गेल्या अनेक दिवसांपासून हजारीपहाड भिवसनखोरी भागात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपायुक्त विनिता साहू तसेच ठाणेदार गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिट्टीखदान पोलिसांनी कारवाईसाठी सापळा रचला. शुक्रवारी दुपारी १च्या सुमारास आरोपी महिला कविता तसेच सुनीता या दोघींसोबत पोलिसांच्या पंटरने संपर्क साधला. पंधराशे रुपयात एक वारांगना उपलब्ध करून देण्याची या दोघींनी तयारी दाखवली. त्यानुसार दोन वारांगना ग्राहकाने मागितल्या. दुपारी ४ च्या सुमारास ग्राहकासोबत वारांगना रूममध्ये गेल्या. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी छापा घातला. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी यावेळी आरोपी कविता आणि सुनीता या दोघी पैशांचे प्रलोभन देऊन वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी या दोघींना अनैतिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.
यापूर्वीही झाली कारवाई
आरोपी कविता आणि सुनीता अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती पुढे आली आहे. कविताला यापूर्वीही पोलिसांनी अशाच प्रकारे अटक केली होती, असे गिट्टीखदान पोलिसांनी सांगितले.