लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मानकापुरातील एका गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा घातला. तेथे घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस वाहनात भरली जात होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मोहम्मद जावेद मोहम्मद शकील (वय ३२, रा. संत ज्ञानेश्वर सोसायटीजवळ, मानकापूर), वसिम अब्दुल लतिफ (३८, ज्ञानेश्वर कॉलनी, ताजनगर मानकापूर आणि या दोघांना सिलिंडर पुरवठा करणारा गॅस एजन्सीचा कर्मचारी रमेश महादेवराव कोलते (६०, रा. बेझनबाग) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी जावेद आणि वसिमने मानकापुरात अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर सुरू केले होते. ते येथे घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस वाहनात भरत होते. हा अत्यंत धोक्याचा प्रकार असून, गॅस गळती झाल्यास आजूबाजूच्या नागरिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो, हे माहिती असूनही आरोपी ते करीत होते. त्याची कुणकुण लागताच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी तेथे छापा घातला. आरोपी जावेद आणि वसिमच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून १२ सिलिंडर, गॅस रिफिलिंगची मशीनसह १८ हजारांचे साहित्य जप्त केले. हे दोघे आणि त्यांना सिलिंडर पुरविणारा कोलते या तिघांवर मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
---
----