लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - स्वत:च्या घरी वारांगनांना आणून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या मुन्नीबाई मकसूद पठाण (वय ४५) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) बुधवारी सायंकाळी छापा घातला. या छाप्यात एक वारांगना आणि तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी मुन्नीबाई पोलिसांच्या हाती लागली.
गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्याकडे एका स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अजनीत राहणाऱ्या मुन्नीबाईच्या कुंटणखान्याची माहिती पोहचवली होती. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी राजमाने यांनी एसएसबीच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा लावला. ठरल्याप्रमाणे पोलिसांनी पाठविलेल्या ग्राहकाला सात हजार रुपयांत एक वेश्या उपलब्ध करून देण्याची तयारी मुन्नीबाईने दाखवली. ग्राहकासोबत वेश्या एका रुममध्ये जाताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांनी वारांगनेचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर तिला समज देऊन सोडून दिले तर आरोपी मुन्नीबाईला पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.
---