नागपूर : काय सांगता.. ७७ रुपये लिटर पेट्रोल! होय खर ऐकलत तुम्ही! खापरी परिसरातील एका झोपडीत एक महिला चक्क ७७ रुपये प्रति लिटर पेट्रोल विकत होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत पेट्रोल चोरी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला असून संबंधित महिलेसह तिघांना अटक केली आहे.
नागपुरातील खापरी परिसरात मीना द्वीवेदी नामक महिलेच्या घरी अवैधरित्या पेट्रोल विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकत एक-दोन नव्हे तब्बल १२ हजार लिटर पेट्रोलचा साठा जप्त केला. ती व तिचे तीन साथीदार मिळून पेट्रोलियम कंपनीच्या डेपोपासून पेट्रोल पंपापर्यंतच्या वाहतुकीत टँकरवर बसवण्यात आलेली दुहेरी सुरक्षाव्यवस्था निकामी करून पेट्रोल चोरी करायचे. यात टोळीसह टँकर चालकही सहभागी होते.
गेली अनेक महिने येथून पेट्रोल ७७ रुपये लिटरने विकले जात होते. या रॅकेटबद्दल माहिती मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांनी रविवारी सकाळी छापा टाकला व झोपडीतून पेट्रोलच्या कॅनसह १२ हजार लिटर पेट्रोल जप्त केले. इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा साठा मिळाल्याने पोलीसदेखील चक्रावून गेले होते.
विदर्भातील काही मोठ्या पेट्रोल डेपोतून रोज शेकडो लिटर पेट्रोल ठिकठिकाणी जातात. दरम्यान टँकर चालक सुनसान स्थळी थांबून टँकरमधून काही लिटर पेट्रोल काढून ते पेट्रोल विकणाऱ्या टोळीला देत असे. पुढे ही टोळी ते पेट्रो विकत असे. याप्रकरणी महिला व तिच्या साथीदारांना पोलीसांनी अटकेत घेतले असून पेट्रोल चोरीचा गोरखधंदा समोर आला आहे.