नागपूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आक्रमक आंदोलन उभं केल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. जरांगे पाटील यांच्यावर टीका करत ओबीसी नेत्यांकडून एल्गार मेळावे आयोजित केले जात आहेत आणि या मेळाव्यांचं नेतृत्व करत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आरक्षणाचा मुद्दा गाजत असून कालपासून या विषयावर सभागृहात चर्चा सुरू झाली. आरक्षण प्रश्नावर भाष्य करत असताना आज भुजबळ यांनी धक्कादायक दावा केला. माझ्यावर गोळी घातली जाणार असल्याचा रिपोर्ट पोलिसांकडे असल्याने कालपासून माझ्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणावर विधिमंडळात चर्चा सुरू असताना आज छगन भुजबळ यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली. "मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र ते स्वतंत्र आरक्षण असावं, मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये," अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली. तसंच मराठा समाजाला सध्या ज्या योजनांचा फायदा मिळत आहेत, त्या योजना इतर समाजांसाठीही लागू करण्यात याव्यात, असंही भुजबळ म्हणाले. आरक्षणावर बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. तसंच जरांगे पाटलांच्या काही वक्तव्यांचा दाखला देत त्यांच्याकडून कशा प्रकारे हिंसेची भाषा केली जात आहे, ते सांगितलं.
"२४ डिसेंबरला नाशिक येथे भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फार्म हे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी नावं कळवावीत, असंही जरांगेंनी म्हटलं आहे. म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाला, संदीप क्षीरसागर यांच्याही घरावर हल्ला झाला. तिथं कोणीही गेलं नाही. उद्या माझ्यावर हल्ला झाल्यानंतरही कोणी यावं अशी अपेक्षा नाही. मात्र कालपासून माझ्या सुरक्षेत वाढ करण्यात येत आहे. त्यावर पोलिसांनी सांगितलं की, तुम्हाला गोळी घातली जाईल, असा अहवाल आहे," असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी सभागृहात केला आहे.
दरम्यान, "मला मारायचं असेल तर मारा, हरकत नाही. पण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आणि ही झुंडशाही थांबवा," असंही भुजबळ यावेळी म्हणाले.