१२ तासानंतरही आरोपींचा सुगावा नाही : पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह नागपूर : पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांचे वडिलांचे दीड लाख रुपये लुटण्यात आले. हा धक्कादायक प्रकार सिव्हील लाईन्स येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर दुपारी घडला. शहरातील आयपीएस अधिकाऱ्याच्या वडिलांना लुटण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून पोलिसांची बोलतीही बंद झाली आहे. आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आल्याचा प्रकार घडल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेला १२ तास उलटले तरी आरोपीचा कुठलाही सुगावा न लागल्याने पोलिसांमध्येही खळबळ माजली आहे. झोन-१च्या डीसीपी दीपाली मासिरकर यांचे वडील रविचंद्र मासिरकर हे सेवानिवृत्त वन अधिकारी आहेत. ते आपल्या दुचाकीने बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास सिव्हिल लाईन्सस्थित आयसीआयसीआय बँकेत गेले. त्यांनी आपल्या खात्यातून ५० हजार रुपये, मुलीच्या खात्यातून ५० हजार रुपये आणि नंतर अॅक्सिस बँकेच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले. दीड लाख रुपये आपल्या बॅगेत ठेवून ते घरी परत जाण्यासाठी निघाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका बाईकवर आलेल्या दोन युवकांनी मासिरकर यांना त्यांची दुचाकी पंक्चर झाल्याचे सांगितले. मासिरकर यांनी लगेच गाडी थांबविली आणि टायर खरंच पंक्चर झाला का म्हणून पाहू लागले. त्याच वेळी लुटारूंनी त्यांच्या खांद्यावर असलेली बॅग हिसकावली व फरार झाले. मासिरकर यांनी लगेच पोलिसांनी सूचना केली. सदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडित डीसीपी दीपाली मासिरकर यांचे वडील असल्याचे लक्षात येताच पोलीस हादरले. त्यांनी आयसीआयसीआय बँकेत आणि परिसरातील इतर कार्यालयात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. परंतु आरोपींचा कुठलाही सुगावा लागला नाही. आरोपी बँकेतूनच मासिरकर यांचा पाठलाग करीत असल्याचा संशय आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते सेंट उर्सुला शाळेच्या मैदानाजवळ फारशी गर्दी नसल्याने आरोपींनी मासिरकर यांना तेथेच थांबविले. या घटनेमुळे नागरिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. ‘स्ट्रीट क्राईम’वर ब्रेक लावण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये बीट सिस्टम लागू करण्यात आली आहे. प्रत्येक बीटमध्ये अधिकारी-कर्मचारी तैनात करून त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मानस चौकात झालेल्या खुनाची घटनासुद्धा बीट सिस्टमच्या अपयशाचा पुरावा आहे. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या खुनाची माहिती मंगळवारी मिळाली. त्याचप्रकारे गुन्हेगार दत्तक योजनासुद्धा लागू करण्यात आली. याअंतर्गत गुन्हेगारांवर सातत्याने नजर ठेवली जाते. नागरिकांमध्ये राहून काम करण्यासाठी गुन्हे शाखेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्याचाही फारसा प्रभाव पडताना दिसून येत नाही. १६ मार्च रोजी अण्णा गँगने कारमधून रोख व दागिने लुटले होते. अण्णा गँग शहरात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना १५ दिवसांपूर्वीच मिळाली होती. परंतु कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात न आल्याने या गँगने पाच लोकांना लुटले होते. यानंतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी महत्त्वाच्या स्थळी लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. सिव्हील लाईन्समधील बँकेतून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना यापूर्वी सुद्धा अनेकदा लुटण्यात आले आहे. ताजे प्रकरण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. (प्रतिनिधी) हेल्मेटचा वापर लुटारुंनी आपली ओळख लपविण्यासाठी हेल्मेटचा वापर केला होता. यातून ते सराईत गुन्हेगार असल्याचा संशय आहे. लुटारुंना शोधण्यासाठी पोलीस सराईत गुन्हेगार व संशयित गुन्हेगारांची धरपकड करीत आहे. आरोपी न सापडल्याने पोलिसांवरील कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. पोलीस संख्येच्या आधारावर चेन स्नॅचिंग कमी झाल्याचा दावा करीत आहे. परंतु १६ मार्चपासून आतापर्यंत चेन स्नॅचिंग आणि लुटण्याच्या घटना सातत्याने सुरू आहेत. सोमवार व मंगळवारी सुद्धा दोन महिलांना लुटण्यात आले होते. तर आमचे काय होणार या घटनेमुळे सामान्य नागरिक अतिशय घाबरलेले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच लुटले जात असेल तर आमचे काय होणार. त्यांची ही भीती स्वाभाविक आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम पोलिसांना रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु सकारात्मक परिणाम मिळू शकलेले नाही.
पोलीस उपायुक्तांच्या वडिलांना लुटले
By admin | Published: March 23, 2017 2:37 AM