नागपूर : मंगळवारी पकडण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे. त्या दिशेने तपासाला सुरुवात झाली आहे. अवैध प्रकरणांमध्ये या नागरिकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना विचारपूस करण्यासाठी ३ नोव्हेंबरर्पंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी गणेशपेठ येथील संत्रा मार्केटमधून बांगलादेशी नागरिक मो. अबुल हसन (४५), त्याचा मुलगा मो. आमीनुर हसन (२१), रबीउल हुसैन (४०), सिमुल हसन (२१)आणि एक तरुणाला पकडण्यात आले होते. आरोपी अनेक दिवसांपासून शहरात राहत होते. ते फळ विकत होते. गुन्हे शाखेचे डीसीपी रंजन शर्मा यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणात ११ संशयितांना पकडले आहे. यापैकी ६ लोकांकडे आधार कार्ड आणि इतर दस्ताऐवज होते. त्यांना सोडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे भारतीय नागरिक असल्याचे कुठलेही प्रमाणपत्र नव्हते. त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. यादरम्यान त्यांची गुन्हेगारीतील भूमिका आणि नागपुरात येण्याचा उद्देशाची माहिती काढली जाणार आहे. भारतीय नागरिक असल्याचे दस्तऐवज असल्याने काहींना सोडण्यात आले. त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असेही शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्यावर बारीक नजर ठेवली जाणार आहे. त्यांच्या दस्ताऐवजाची तपासणी केली जाईल. व्हिसा कालावधी संपल्यावरही नागपुरात राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांबाबत मात्र आपल्याकडे कुठलीही माहिती नसल्याचे शर्मा यांनी सांगितले. ही कारवाई डीसीपी रंजन शर्मा, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जी.डी. कुंभार, प्रमोद सानप, एएसआय श्रीनिवास मिश्रा, हवालदार सुरेश ठाकूर, राजकुमार देशमुख, अफसर खान, सुनील चौधरी, शिपाई शरद मेश्राम, अमित पात्रे, राजेंद्र सेंगर, पंकज मोरे, श्यामाकुमार कमलाकर यांनी केली. (प्रतिनिधी)
बांगलादेशी नागरिकांच्या मूळापर्यंत जाणार पोलीस
By admin | Published: October 29, 2015 3:28 AM