योगेश पांडे
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मात्र अद्यापही सना यांचा मृतदेह व फोन सापडलेले नाहीत. सना यांचे फोन नष्ट करण्यामागे आरोपींचा नेमका काय हेतू होता हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सना यांच्या फोनच्या ‘डेटा’साठी नागपूर पोलिसांच्या सायबर टीमने ‘गूगल’कडे धाव घेतली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, आरोपी अमित साहू हा नेहमी सना यांना दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न करायचा व त्याने त्यांच्या मुलाला जीवे मारण्याचीदेखील धमकी दिल्याची बाब समोर आली आहे.
सना खान हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी व जबलपूर येथील कुख्यात गुन्हेगार अमित उर्फ पप्पू साहू आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित साहू व त्याच्या सहकाऱ्यांकडून सेक्सटॉर्शनचे रॅकेटदेखील चालविण्यात येत होते. अमित साहूसह धर्मेंद्र यादव नावाच्या गुन्हेगाराला व त्याचा पिता वाळूमाफिया रब्बू यादव या दोघांना अटक करण्यात आली होती. अमितने हत्या केल्यानंतर धर्मेंद्रचा खास माणूस असलेल्या कमलेश पटेलने रब्बूसोबत सना यांचे मोबाइल फोन नष्ट केले होते. त्यासंदर्भात अमितने दोन्ही खास माणसांनाच जबाबदारी दिली होती.
सना यांच्या मोबाइलमध्ये निश्चितच काही तरी ‘सिक्रेट’ होते. त्यामुळेच त्यांचे मोबाइल नष्ट करण्यात आले. सना यांच्या मोबाइलमधील ‘डेटा’ मिळविण्यासाठी सायबर टीमचे पथक काम करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मोबाइलमधील ‘डेटा’ जर ‘क्लाऊड’वर किंवा ‘गूगल ड्राइव्ह’वर ‘स्टोअर’ असेल तर तो परत मिळविता येऊ शकतो. पोलिसांकडे सध्या त्यांच्या ई-मेल आयडीचा पासवर्ड नाही. त्यामुळेच फोनच्या ‘डेटा’साठी ‘गूगल’ ला ‘ई-मेल’ केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जर हा ‘डेटा’ मिळाला तर या प्रकरणातील मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्याशी संपर्क केला असता मोबाइलमधील ‘डेटा’ मिळविण्याचा सायबर तज्ज्ञांकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी ‘गूगल’ला संपर्क केला का किंवा ‘गूगल’कडून काही माहिती आली का याची कल्पना त्यांनाच असेल. मात्र मोबाइल किंवा ‘डेटा’ मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
सना ने फोन नही उठाया तो बच्चे को नही छोडुंगा
अमित साहूला टाळण्याचे सना यांच्याकडून बरेच प्रयत्न सुरू होते. मात्र तो वारंवार फोन करून धमकवायचा. हत्येच्या काही काळाअगोदर सना घरी नसताना अमितने त्यांच्या घरी फोन केला होता. तेव्हा केअरटेकरने फोन उचलला होता. त्यावेळी अमितने केअरटेकरकडे सनाला लवकर फोन करण्यास सांगितले होते. जर तिने फोन केला नाही तर तिच्या मुलाला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती, अशी माहिती सनाच्या आई मेहरुन्निसा खान यांनी ‘लोकमत’ला दिली. अमितने सना यांना मुलाच्या जीवाची भीती दाखवून त्याने दहशतीत ठेवले होते.