लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पागलखाना चौकाजवळ छापा मारून गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात मद्यतस्कर अशोक वासन याच्याकडून चंद्रपुरात केल्या जाणाऱ्या मद्यतस्करीचा पुन्हा एकदा सोमवारी भंडाफोड केला. पोलिसांनी येथून विलायती दारू, वाहनांसह ११ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना अटक केली. मद्यतस्करीचा सूत्रधार अशोक वासन मात्र फरार झाला आहे.
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातून मोठ्या प्रमाणात मद्यतस्करी केली जाते. यात मद्यतस्करांचे मोठे नेटवर्क गुंतले असून, जवळपास रोजच दारूची मोठी खेप तिकडे पोहचते. दोन वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात विलायती दारू भरून पाठविली जाण्याची तयारी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-५ चे वरिष्ठ निरीक्षक विनोद पाटील यांच्या पथकाने पागलखाना चौकाजवळच्या सदोदय अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री ७.३० वाजता छापा घातला. येथे एक कार आणि टाटा एसमध्ये दारूच्या पेट्या लादताना आरोपी किरण मोतीराम हडगुळे (वय ४९, रा सोनबानगर) आणि देवेंद्र उदय सिंग (वय ३६, रा. लोकमान्यनगर, हिंगणा) हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील १ लाख १० हजाराची दारू, मोबाईल, दोन वाहने असा एकूण ११ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांनी पोलिसांच्या चौकशीत या मद्यतस्करीचा सूत्रधार अशोक वासन असल्याचे सांगितले. पोलिसांचा छापा पडताच तो पळून गेला.
१५ दिवसात दुसरी कारवाई
आरोपी अशोक वासनचे मेयो चौकात वाईन शॉप आहे. १९ ऑक्टोबरला गुन्हे शाखेने त्याच्या दोन साथीदारांना बेलतरोडीत मद्यतस्करी करताना पकडले होते. आता पुन्हा त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले. तो मात्र फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.