नागपूर : एका गरीब महिला विक्रेत्याचा भाजीपाला अमानुषपणे रोडवर फेकून जरीपटकाच्या पोलीस उपनिरीक्षकाने कायदेशीर अधिकाराचा दुरुपयोग केला, असे मत शहरातील प्रसिध्द फौजदारी विधिज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तसेच, संबंधित पोलीस उपनिरीक्षक या कृतीसाठी सामान्य व्यक्तीप्रमाणेच कायदेशीर कारवाईसाठी पात्र असल्याचे स्पष्ट केले.
अॅॅड. शशिभूषण वहाणे यांनी कायदेशीर अधिकारांचा कायद्याने ठरवून दिलेल्या पध्दतीनेच उपयोग करणे बंधनकारक आहे, असे सांगितले. बेकायदेशीर कृती करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. परंतु, ते हा अधिकार वापरताना कायदा हातात घेऊ शकत नाही. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने भाजीपाला रोडवर फेकून कायद्याची पायमल्ली केली. त्याकरिता पोलीस उपनिरीक्षकावर योग्य कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
अॅड. राजेंद्र डागा यांनी या घटनेचा निषेध केला. ही घटना मानवी संवेदना दुखावणारी आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला भाजीपाला जप्त करून महिला विक्रेत्यावर गुन्हा नोंदवता आला असता. परंतु, त्याने तसे न करता महिला विक्रेत्याचे आर्थिक नुकसान केले. या कृतीद्वारे पोलीस उपनिरीक्षकाने स्वत: गुन्हा केला, असे अॅड. डागा यांनी पुढे सांगितले.
पोलिसांना एखाद्या व्यक्तीवर कारवाई करताना कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने या कायदेशीर तरतुदीची पायमल्ली केली. भाजीपाल्याची नासधूस करून महिला विक्रेत्याचे आर्थिक नुकसान केले. या कृतीसाठी पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई केली गेली पाहिजे, असे मत अॅड. आर. के. तिवारी यांनी व्यक्त केले.
अॅड. अनिल ढवस यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची कृती गैरव्यवहार असून त्यासाठी तो विभागीय चौकशी व गुन्हा दाखल होण्यास पात्र आहे अशी माहिती दिली. पोलिसांना कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. परंतु, हा अधिकार वापरताना माणुसकी जपणेही आवश्यक आहे. पोलीस अशाप्रकारे कुणाचे नुकसान करू शकत नाही याकडेसुध्दा अॅड. ढवस यांनी लक्ष वेधले.