नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चांगलेच वादळ उठले आहे. पटोलेंविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपने ठिय्या आंदोलन पुकारले. दरम्यान, कोराडी पोलीस ठाणे परिसरात पटोले यांच्या विरोधातील आंदोलनात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मोदींबाबत खबळजनक वक्तव्य केले होते. 'मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं ते म्हणाले होते. यानंतर, भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी पटोलेंविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर, नागपुरात भाजप कार्यकर्ते कालपासून पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दम धरुन बसले आहेत.
आमदार चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजप कार्यकर्त्यांनी जोपर्यंत पटोलेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपने पोलीस ठाणे परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तर, आता पोलिसांनी बावनकुळे यांना ताब्यात घेतले आहे.