लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गंगा जमुना येथील वेश्या व्यवसायातून बाहेर काढण्यात आलेल्या मुलीचे व त्या मुलीचा पिता म्हणवणाऱ्या व्यक्तीचे सत्य शोधण्यासाठी पोलिसांची चमू राजस्थानला जाणार आहे. चमूमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल यांचा समावेश राहणार आहे. पोलीस उपायुक्त (झोन-१) कृष्णकांत उपाध्याय यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. ते न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित होते.न्यायालयाच्या आदेशानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने राजस्थानला जाऊन पीडित मुलगी व कथित पित्याचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी गोळा करून आणली होती. परंतु, त्यावर पुढे काहीच तपास करण्यात आला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने गेल्या तारखेला पोलीस प्रशासनाची खरडपट्टी काढून त्यांच्यावर अपरिपक्व व पोस्टमन असे झणझणीत ताशेरे ओढले होते. तसेच, आयपीएस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात योग्य माहिती सादर करावी, असा आदेश दिला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी न्यायालयात उपस्थित होऊन राजस्थानला विशेष चमू पाठवित असल्याचे सांगितले. दरम्यान, अॅड. शशिभूषण वाहने यांनी फ्रिडम फर्म या सामाजिक संस्थेच्या एका प्रतिनिधीला व कथित पित्याला चमूस सहकार्य करण्यासाठी राजस्थानला पाठविण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून त्यासंदर्भात निर्देश दिलेत. पीडित मुलगी बुंदी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यामुळे तेथील पोलीस अधीक्षकांचे तपासाकरिता सहकार्य घ्यावे व आवश्यक मदतीसाठी या आदेशाची प्रत राजस्थान उच्च न्यायालयाला सादर करण्यात यावी असेही न्यायालयाने सांगितले. तपासकार्य पूर्ण करण्यासाठी पोलिसांना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तेव्हापर्यंत पीडित मुलीला करुणा शासकीय आश्रयालयात ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायातून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करणे व अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणारे रॅकेट नष्ट करणे यासाठी फ्रिडम फर्म या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. संबंधित मुलीला या संस्थेनेच वेश्या व्यवसायातून बाहेर काढले आहे. संस्थेतर्फे अॅड. निहालसिंग राठोड यांनी बाजू मांडली.
त्या मुलीचे सत्य शोधण्यासाठी पोलिसांची चमू राजस्थानला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 9:58 PM
गंगा जमुना येथील वेश्या व्यवसायातून बाहेर काढण्यात आलेल्या मुलीचे व त्या मुलीचा पिता म्हणवणाऱ्या व्यक्तीचे सत्य शोधण्यासाठी पोलिसांची चमू राजस्थानला जाणार आहे. चमूमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल यांचा समावेश राहणार आहे. पोलीस उपायुक्त (झोन-१) कृष्णकांत उपाध्याय यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.
ठळक मुद्देहायकोर्ट : पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची माहिती