लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान तर आहेच पण ते राष्ट्रीय कर्तव्यही आहे. त्यामुळे रक्तदान करताना एक वेगळी गाैरवास्पद अनुभूती मिळते, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर राज्यभरात सुरू असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा रक्तसंकलन महायज्ञ मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील हिरवळीवर संपन्न झाला. यावेळी अधीक्षक ओला यांनी उपरोक्त विधान केले. यावेळी अतिरिक्त अधीक्षक राहुल माकणिकर, उपअधीक्षक संजय पुरंदरे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमूख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके, त्र्यंबक प्रधान आदी उपस्थित होते.
खुद्द पोलीस अधीक्षक ओला, अतिरिक्त अधीक्षक माकणिकर, उपअधीक्षक पुरंदरे, एलसीबी इन्चार्ज जिट्टावार यांनीच प्रारंभी रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यालयाचे चार्ली, कमांडोज, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, नियंत्रण कक्ष, सायबर सेलचे जवान आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
----
पावसाची हजेरी आल्हाददायक ठरली
रक्तदानाचा महायज्ञ सुरू असताना पावसाने हजेरी लावली. मात्र, आधीच वॉटरप्रूफ शामियाना घातला असल्याने पावसाची हजेरी या शिबिरात आल्हाददायक अनुभूती देणारी ठरली.
---