लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुप्तवार्ता विभागाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेले नगापुरातील अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाची बाधा घेऊन परतले आहे. प्रशिक्षणप्राप्त १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.
गुप्तवार्ता (खुपिया) विभागात काम करणाऱ्या पोलिसांसाठी पुण्यात एसआरपीएफ, एमआयएतर्फे ३० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नागपुरातील ३३ महिला-पुरुष पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. २९ ऑगस्टला ते पुण्यात गेले. प्रशिक्षण ऑटोपून १० सप्टेंबरला ते परत आले. त्यातील काही जणांना शनिवारी दुपारपासून सर्दी पडसे आणि कणकण वाटू लागली. त्यामुळे काहींनी सुट्टीसाठी आपल्या वरिष्ठांकडे विचारणा केली. मात्र, गणेशोत्सव बंदोबस्तामुळे ठोस कारणाशिवाय सुट्ट्या देणे बंद असल्याने वरिष्ठांनी पोलीस हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क करण्याचा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना सल्ला दिला. या पार्श्वभूमीवर, शनिवारी काही पोलिसांची आरटीपीसीआर करून घेण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाचे लक्षण आढळले. पोलीस हॉस्पिटलचे डॉ. संदीप शिंदे यांनी ही बाब पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर प्रशिक्षणाला गेलेल्या ३३ ही जणांची तपासणी करून घेण्यात आली. त्यांच्यातील १२ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सर्वांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून, इतरांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांवरही लक्ष ठेवण्यात आले आहे.
----
लसीकरण झाले होते
बाधित आढळलेल्या १२ जणांमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून, या सर्वच्या सर्व १२ ही जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत, हे विशेष.
-----