नागपूर : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जाहीर झालेल्या संचारबंदीच्या काळात पोलिसांनी कुणालाही सूट न देण्याचे ठरविले आहे. बुधवारी रात्रीपासूनच नाकाबंदी आणि गस्त सुरू झाली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे वाहन डिटेन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जागोजागी पोलिसांची चौकी व गस्तही सुरू झाली आहे.
वेगाने वाढत असलेले कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. उपराजधानीमध्ये कोरोनाने विक्राळ रूप घेतले आहे. रुग्णालयात जागा आणि उपचार तसेच जीवनावश्यक औषध मिळणे कठीण झाले आहे. पोलिसही मोठ्या संख्येने या सावटात येत आहेत. ते आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड हाॅस्पिटल, कंटेन्मेंट झोन, लसीकरण केंद्रांवर सेवा देत आहेत. बुधवारी रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसाठी त्यांनी कंबर कसली आहे. आपात्कालीन आणि जीवनावश्यक सेवांखेरीज अन्य कोणत्याही व्यवसायाला परवानगी नाही. धान्य, किराणा तसेच भाजी व फळांची दुकाने सुरू राहतील. या खरेदीच्या बहाण्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर भादंविच्या कलम १८८ नुसार अटक करण्याचे किंवा अन्य कारवाई करण्याचे निर्देश आहेत. वाहन डिटेन करण्याचेही निर्देश आहेत.
कोरोना संक्रमितांकडून रुग्णालयाची तोडफोड होण्याच्या घटना थांबविण्यासाठी खासगी रुग्णालयासमोर पोलिसांची नियुक्ती असेल. शासकीय रुग्णालयांमध्ये २४ तासाची गस्त लावून निगराणीचे आदेश आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शन अथवा अन्य औषधांचा काळाबाजार सुरू असल्याचे लक्षात आल्यास पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांच्या उपस्थितीत तात्काळ कारवाई केली जाईल. कारवाईदरम्यान सक्ती करण्यासोबत संयम बाळगण्याच्याही सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय उपचार, लसीकरण, रेल्वे किंवा विमान प्रवास तसेच आवश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही. मात्र आवश्यक ती कागदपत्रे दाखवावी लागतील. पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक केले जाईल.
... प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे : पोलीस आयुक्त
पोलीस आयुक्त अमितेश कुमार ‘लोकमत’च्या माध्यमातून आवाहन करताना म्हणाले, संक्रमणावर लवकरात लवकर नियंत्रण आणण्यासाठी नागिरकांनी पोलिसांना सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. पोलीस बाजारातही निगराणी करणार आहेत. खरेदीच्या बहाण्याने सूट दिली जाणार नाही. कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्यास पोलिसांना कळवावे.
...