इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टम लवकरच कार्यान्वित
कोंढाळी : नागपूर जिल्ह्यासह राज्यात ११२ नंबर डायल करताच १० मिनिटात पोलीस मदत तातडीने मिळणार आहे. जिल्ह्यात ही योजना वास्तवात आणण्यासाठी ३५ वाहनांची गरज आहे. यातील १९ वाहन उपलब्ध झाले आहेत. लवकरच ही योजना जिल्ह्यासह राज्यात सुरू होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित पोलीस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टम अंतर्गत ११२ डायल उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २ अधिकारी व १६ पोलीस अंमलदाराचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यासोबतच ३४० पोलीस अंमलदाराचे प्रशिक्षण होणार आहे. राज्यात खून, प्राणघातक हल्ले, चेन स्नॉचिंग, महिला व मुलीची छेड व अत्याचार आदी गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. यास आळा घालण्यासाठी व गुन्हेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टम उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातून ११२ नंबरवर येणाऱ्या कॉलचे केंद्रीकरण नवी मुंबई मुख्य केंद्र व नागपूर उपकेंद्रात अशा दोन भागात होणार आहे. विदर्भासाठी नागपुरात मुख्य नियंत्रण कक्ष राहील. संकटकाळात ११२ नंबर डायल करताच नियंत्रण कक्षाला कॉलचे लोकेशन कळेल. नियंत्रण कक्ष त्या भागातील बिटमार्शल मोबाइल व्हॅनला संदेश देऊन अवघ्या १० मिनिटात पोलीस मदत मिळेल, अशी संकल्पना आहे. ही यंत्रणा २४ तास सज्ज राहणार आहे.