नागपूर : हाटे बंधू आणि नब्बू अशरफी पकडल्या गेल्यावर आता गुन्हे शाखेने रणजित सफेलकरच्या शोधासाठी कंबर कसली आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रसंग पडलाच तर त्याला आरपार करण्याची सूटही पोलिसांना दिल्याची माहिती आहे. यामुळे सफेलकरसंदर्भात मोठी बातमी केव्हाही येऊ शकते, अशी स्थिती आहे.
सीबीआयकडून निमगडे हत्याकांडाचा तपास सुरू आहे. मात्र गुन्हे शाखेने या प्रकरणातील गुंता सोडविला. पाच कोटी रुपयात निमगडेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सफेलकरने कालू हाटेच्या माध्यमातून नब्बू अशरफी याला सुपारी दिली. नब्बूने शाहबाजच्या मदतीने छिंदवाड्यातील राजा ऊर्फ पीओपी आणि आजमगडच्या परवेजला हे काम सोपविले. नब्बूने प्लॅन तयार केला. कालू हाटे, त्याचा भाऊ भरत हाटे तसेच नब्बू अशरफी यांना पकडल्यानंतर गुन्हे शाखेने रणजित सफेलकरला पकडण्याची पूर्ण तयारी केली आहे.
सफेलकर भंडाऱ्याच्या जंगलात दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सोमवारी पोलिसांनी तिथे धडक दिली. तो तिथे लपून असल्याची खात्रीलायक माहिती असल्याने पोलीस आरपारच्या तयारीत पोझिशन घेऊन होते. मात्र तो जंगलात पळाला. पोलिसांनी बऱ्याच अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला, मात्र तो हाती लागला नाही. यामुळे पोलीस अधिकारी अस्वस्थ आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फ्री हॅन्ड दिल्याने तो कोणत्याही निर्णयावर उतरू शकतात.
सूत्रांच्या मते, नब्बू अशरफी सुपारी घेतल्याचे कबूल करीत असला तरी रकमेबद्दल विसंगत बयान आहे. नब्बू फरार असण्याच्या काळात तो त्याच्या माणसाच्या संपर्कात होता. यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो असे करीत असावा म्हणून तो असंबद्ध माहिती देत असावा, अशी शंका आहे. नब्बू आठवडाभरापासून निमगडेची निगराणी करीत होता. त्याच्या माहितीनुसार, राजा ऊर्फ पीओपी आणि परवेज यांनी हत्येच्या वेळी बुरखा घातला होता. राजाच्या मते, तो दुचाकी चालवीत होता. मागे बसलेल्या परवेजने गोळी चालविली. काही अंतरावर नब्बू आणि अन्य आरोपी उपस्थित होते. पोलिसांनी बुधवारी नब्बू, कालू हाटे आणि भरतसोबत वेगवेगळी चर्चा केली. पळण्याच्या प्रयत्नात कालू जखमी झाला आहे.
...
कपिलनगरात सापडला जुगार अड्डा
सूत्राच्या माहितीनुसार, नब्बू आणि त्याच्याशी जुळलेल्या लोकांच्या हालचालीची माहिती पोलिसांना सहज मिळत आहे. यामुळे नब्बूकडून मुस्ताक आणि अन्य साथीदारांच्या माहितीसंदर्भात पोलिसांची तो दिशाभूल करीत असल्याची माहिती आहे. नब्बू आणि मुस्ताक अट्टल गुन्हेगार आहेत. नब्बूला आठ महिन्यापूर्वीच कपिलनगरात जुगार अड्डा चालविताना पकडण्यात आले होते. त्यावेळीही त्याच्याकडे पिस्तूल होते. मात्र पोलिसांना कळले नाही.
...