लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्षे परिश्रम करून तो अखेर गेल्या वर्षी पोलीस बनला. त्याची कारागृहात रक्षक म्हणून निवड झाली. मात्र, पोलीस बनण्यासाठी त्याने गैरप्रकार केला. एक वर्ष होत नाही तो त्याची बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे त्याला आता कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. कैलास प्रकाश बगडे असे त्याचे नाव असून तो परभणी जिल्ह्यातील पडेगाव येथील रहिवासी आहे.जून २०१७ मध्ये नागपूर ग्रामीण पोलीस दलाने घेतलेल्या पोलीस भरतीत कैलास बगडे याने सहभाग घेतला होता. मूळ शैक्षणिक कागदपत्रांसोबतच त्याने खेळाडूसाठी असलेल्या राखीव जागेसाठी फुटबॉल खेळातील प्रावीण्य प्रमाणपत्रही सादर केले होते. त्यानुसार, त्याची कारागृह पोलीस शिपाई म्हणून ९ जून २०१७ ला निवड झाली. तो रुजूही झाला. त्याने सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा संबंधित विभागाकडून सुरू झाली. त्याने सादर केलेले अॅम्युचुअर रब्बी फुटबॉल असोसिशन आॅफ महाराष्ट्र तसे सहायक संचालक क्रीडा व युवक सेवा महाराज्य पुणे यांच्याकडून पडताळणी अहवाल नुकताच कारागृह प्रशासनाला मिळाला.
अन् भांडे फुटलेबगडेने सादर केलेले प्रमाणपत्र तसेच संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्याने त्या प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी केल्याचेही उघड झाले. त्यामुळे भुमेश्वर जागोजी लोहकर (वय ४९, रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत) यांनी तसा तक्रार अर्ज बजाजनगर पोलिसांकडे दिला. पोलिसांनी चौकशी करून बगडेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बगडे याला अटक झाली की नाही, ते बजाजनगर पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही.