गुमगाव : बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण देशात मोठ्या मनोभावे साजरा होत असताना कर्तव्यावर तैनात असलेले पोलीसदादा मात्र दूर राहून नागरिकांची रक्षा करीत आहेत. बहिणीपासून कोसोदूर असलेल्या या दादाला बहिणीची माया लाभावी म्हणून युवा चेतना मंचाच्या वतीने आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा बुटीबोरी येथे आयोजित करण्यात आला होता. यात प्रत्येक पोलीस स्टेशला एक मोठी राखी भेट देण्यात आली. या राखीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक राख्या नागलवाडी येथील युवा चेतना मंचनिर्मित मागास वस्तीतील चिमुकल्यांनी स्वतः तयार केल्या आहेत. बुटीबोरी येथील ५० पोलीस जवानांना राख्या बांधण्यात आल्या. तसेच बुटीबोरी येथील पुनर्जन्म आश्रमातील वृद्धांनाही राख्या बांधण्यात आल्या. याप्रसंगी साथ फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रयाग डोंगरे, बुटीबोरी नगर परिषदचे पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे यांनाही राख्या बांधण्यात आल्या. युवा चेतना मंचच्या सदस्य पूजा सागरकर, मयुरी सूर्यवंशी, कोमल कानफाडे, साक्षी चतुर, श्रुतिका घोडे, दीक्षा जांभूळकर, अश्विनी ढवळे आदी भगिनींनी रक्षाबंधन केले. यावेळी बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, प्रशांत डाहुले, आशिष खंते व युवा चेतना मंच हिंगणा तालुका अध्यक्ष जगदीश वानोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलीसदादा, तुमच्यासाठी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:11 AM