नागपूर : अवैध धंद्यावर पूर्णपणे नियंत्रण न मिळविल्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ठाणेदारांची कान उघाडणी केली. पोलीस आयुक्तांनी अवैध धंदे बंद न झाल्यास ठाणेदारांना कारवाईसाठी तयार राहा, असे सांगितले. पोलीस आयुक्तांच्या या इशाऱ्यामुळे ठाणेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
अमितेश कुमार यांच्या मते, गुन्हेगारीपेक्षा अधिक प्रतिबंधात्मक कारवाई व्हायला हवी. गुन्हेगारी वाढण्यात अवैध धंद्यांची महत्त्वाची भूमिका असते. अवैध धंद्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होते. पोलिसांनी सक्ती करूनही परिसरात अवैध दारू, मटका, जुगार आदींचे अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी मिळतात. यापुढे अशा तक्रारी गंभीरपणे घेतल्या जातील. कोणत्याही परिसरात अवैध धंदे आढळून आल्यास संबंधित ठाणेदारावर कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हेगारी आणि अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नसल्याची तंबी त्यांनी दिली. पोलीस आयुक्तांनी प्रत्येक ठाण्यात गुन्हेगारी आणि प्रतिबंधक कारवाईचा आढावा घेतला. त्यांनी ठाणेदारांना चांगले परिणाम मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले. मागील आठवड्यात अनेक ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी नव्या ठाणेदारांना मार्गदर्शन केले. त्यांनी गणेशोत्सव आणि दहीहंडी जन्माष्टमीत खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला.
.............
नागरिकांसोबत फेसबुक लाईव्ह
पोलीस आयुक्त अमितेश कुमार शुक्रवारी २७ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता नागरिकांशी फेसबुक लाईव्हवरून संपर्क साधणार आहेत. गुन्हेगारी थांबविण्यासाठी आणि पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी ते नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांवर चर्चा करणार आहेत. नागरिक फेसबुक लिंकवरून पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारू शकतात.
..........