नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात निर्माण करण्यात आलेले क्राईम इंटेलिजन्स युनिट फेल झाले आहे. अनेक युनिटमधील मंडळी कर्तव्य सोडून ‘वसुलीभाई’ची भूमिका वठवीत असल्यामुळे शहरातील गुन्हेगारी पुन्हा वाढली आहे. बाल्या बिनेकर हत्याकांडामुळे क्राईम इंटेलिजन्स युनिटची पोलखोल झाली आहे.चार महिन्यांपूर्वी नागपुरात गुन्हेगारी उफाळून आली होती. ती दाबण्यासाठी शहरात प्रत्येक पोलिस ठाण्यात क्राईम इंटेलिजन्स युनिट नेमण्यात आले. या युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फक्त आणि फक्त एकच जबाबदारी देण्यात आली. ती म्हणजे त्यांच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्याची!
ते कुठे जातात, काय करतात, त्यांना कोणकोण भेटतात, ते कुणाला जाऊन भेटतात, त्यांना कुणापासून धोका आहे का किंवा ते कुणाचा गेम करण्याची तयारी करीत आहेत का, याची माहिती काढण्याची जबाबदारी या इंटेलिजन्स युनिटवर होती. या जबाबदारीत कुचराई केल्यास कारवाई करण्याचा दमही तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला होता. या युनिटमधील कर्मचारी-अधिकारी काही दिवस अतिशय जबाबदारीने काम करत होते. परिणामी नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात पोलिसांना यश आले होते.
मात्र गेल्या दोन महिन्यापासून या युनिटचे काम वाऱ्यावर सुटले. सूत्रांच्या माहितीनुसार, आपली जबाबदारी सोडून अनेक इंटेलिजन्स युनिटमधील कर्मचारी त्या त्या भागातील अवैध धंदे, चोरीचे कबाड विकणारे, दारू, सट्टा-मटका, जुगार अड्डे आणि गुन्हेगारांकडून वसुली करण्यात मग्न झाले. यामुळे त्यांना त्यांच्या जबाबदारीला न्याय देता आला नाही. त्याचमुळे गुन्हेगार डोकावले. या युनिटची पोलखोल करणारे प्रकरण म्हणजे बाल्या बिनेकर हत्याकांड होय.
गेल्या १५ दिवसात आरोपी चेतन हजारे आणि त्याच्या साथीदारांनी बाल्या बिनेकरची ३ वेळा हत्या करण्याचा प्रयत्न केला. अखेर शनिवारी त्यांनी बाल्याचा गेम केला. या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपी रेकॉर्डवरचे (सराईत) गुन्हेगार आहेत. त्यामुळे ते ज्या भागात राहतात किंवा ज्या भागात वावरतात, त्या भागातील पोलिसांवर त्यांच्या हालचाली टिपण्याची जबाबदारी होती. मात्र पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे थरारक हत्याकांड घडून आले. हे शहर पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटचे हे फेल्युअर आहे. त्यामुळे आता नागपुरातील क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या कामाची तातडीने समीक्षा करण्याची वेळ आली आहे.