योगेश पांडे
नागपूर : सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे. सोने-चांदीचे दागिने चमकविण्याचा दावा करून या टोळीतील लोक ‘हातचलाखी’ करत असून या माध्यमातून सव्वा महिन्यात लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गत सव्वा महिन्यात नागपुरात यासंदर्भातील चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर काही प्रकरणांत दागिन्यांची कागदपत्रे नसल्याने तक्रारदार समोरच आलेले नाहीत. संबंधित टोळीचे सदस्य एखाद्या पावडर कंपनीचे नाव सांगून घरात प्रवेश करतात. साधारणत: दुपारच्या सुमारासच हे लोक येतात. विशेषत: ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा महिलाच आहेत, तेथे हे जातात. अगोदर भांडी चमकवून देण्याचा दावा करत ते ‘डेमो’ देतात. यादरम्यान त्यांच्याजवळील ‘केमिकल’ व खऱ्या पावडरचा उपयोग करून ते खरोखर संबंधित भांडी चमकवून देतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचादेखील विश्वास बसतो. त्यानंतर हे लोक एखादे चांदीचे लहानसे भांडे मागतात व त्यालादेखील काही वेळात डोळ्यासमोर चमकवून देतात. साहजिकच समोरील व्यक्तीचा विश्वास आणखी वाढतो व त्यानंतर सोने-चांदीचे दागिनेदेखील त्यांना देण्यात येतात. येथूनच टोळीचा खरा खेळ सुरू होतो. लाल रंगाची पावडर पाण्यात टाकून ते मिश्रण तयार करतात व त्यात दागिने टाकतात. त्यानंतर एखाद्या डब्यात किंवा भांड्यात ते पाणी व दागिने टाकून ते गॅसवर गरम करायला सांगतात व पाच मिनिटांनी दागिने पाण्यातून बाहेर काढण्याची सूचना करतात. समोरील व्यक्ती त्यात व्यस्त असताना हे लोक घरातून काढता पाय घेतात. पाच मिनिटांनंतरच आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येते. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.
सव्वा महिन्यात चार गुन्हे
अनेक जणांकडे दागिने किंवा भांड्यांच्या पावत्या नसतात. त्यामुळे या टोळीने फसवणूक केल्यावरदेखील लोक पोलिसांत तक्रार करण्यासाठी समोर येत नाही. गत सव्वा महिन्यात राणाप्रतापनगरातील अरुण रानडे (७०), सीताबर्डीतील कांता डंभारे (७५), वाडीतील रंगराव तायडे (६८), हुडकेश्वरमधील मनीषा चौधरी (४८) या चौघांची अशाच प्रकारे फसवणूक झाली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
‘उजाला’, ‘पतंजली’चे प्रतिनिधी असल्याचा दावा
- अगोदर हे आरोपी संबंधित भागाची ‘रेकी’ करतात.
- दुपारची वेळ पाहून घरासमोर जाऊन आवाज देतात किंवा बेल वाजवितात.
- ‘उजाला’ किंवा ‘पतंजली’ या कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात.
- ‘सर्व्हे’ सुरू असल्याचे सांगत मोफत भांडे चमकवून देण्याची बतावणी करतात.