नागपूर : दागिन्यांना पॉलिश करत चमकविण्याचा दावा करून नागरिकांच्या घरात शिरून गंडा घालणारी ‘पॉलिश गॅंग’ परत सक्रिय झाली आहे. पूर्व विदर्भ, मध्यप्रदेशात गुन्हे केल्यानंतर गॅंगच्या सदस्यांनी परत नागपुरातील घरे ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. बेलतरोडीत दोन दिवसांअगोदर एका महिलेला घरात शिरून फसविण्यात आल्याची घटना घडली आहे.
वैशाली योगेश शेंडे (परसोडी, वर्धा मार्ग) या २५ एप्रिल रोजी घरी एकट्याच होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन व्यक्ती बॅग घेऊन आले व सोने तसेच तांब्याचे भांडे चमकावून देण्याचे लिक्विड विकत असल्याचे त्यांनी सांगितले. शेंडे यांनी लहान मुलीच्या पायातील चांदीचे पैंजण दिले. ती त्यांनी एका लिक्विडमध्ये टाकली व काही वेळातच ती चमकायला लागली. यावरून शेंडे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनी आरोपींना सोन्याचे कानातील टॉप्स व मंगळसूत्र दिले. आरोपींनी ते एका लिक्विडमध्ये टाकले व त्यांना पाणी गरम करण्यास सांगितले.
त्या पाणी गरम करत असताना एका आरोपीने पाण्यात हळद टाकली व लिक्विडमधून दागिने काढत गरम पाण्यात टाकण्याचे हावभाव केले. प्रत्यक्षात त्याने हातचलाखी केली व दागिने पाण्यात टाकलेच नाही. त्यांनी शेंडे यांना गॅसची स्पीड वाढविण्यास सांगितले व ते बाहेरच्या खोलीत आले. शेंडे यांना संशय आला म्हणून त्यांनी भांड्यात हात टाकून पाहिला असता त्यात दागिने नव्हते. त्या धावत बाहेर आल्या असता आरोपी फरार झाले होते. त्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत आरोपी नजरेच्या दूर निघून गेले होते. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली व पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.