भिवापूर (नागपूर) : नगर परिषद, नगरपंचायत निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होतील. मात्र, उमरेड विधानसभा क्षेत्रात सध्या आतापासूनच राजकीय वांदग सुरू झाले आहे. यातच कीर्तन, गोपालकाला व महाप्रसादाच्या पंगतीने होणाऱ्या भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात भाजपाचे माजी सुधीर पारवे आणि विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले मातोश्रीप्रभा संस्थेचे संचालक प्रमोद घरडे यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाने मोखाबर्डी गावात गालबोट लागले.
घरडे यांनी पारवे यांना आपण दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा करीत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. त्यावरून दोघांत वाद झाला. उपस्थितांच्या मध्यस्थीमुळे मारहाणीसारखा अनुचित प्रकार टळला. सध्या भागवत सप्ताहाच्या समारोपात अर्धातास चाललेल्या या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
गोसेखुर्द प्रकल्पात बुडीत ठरलेल्या मोखाबर्डी (बुडीत) येथे कुणबी समाज संस्थेच्या वतीने श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दि.२४) सप्ताहाचा समारोप कीर्तन, गोपालकाला व महाप्रसादाने होणार होता. दरम्यान, समारोपाच्या दिवशी माजी आ. सुधीर पारवे यांचे भाषण सुरू असताना जेवणाच्या पंगतीतून उठलेल्या प्रमोद घरडे यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. त्यामुळे एरवी ‘गोड’ बोलणारे माजी आ. पारवे तापले. दोन्हीकडून शाब्दिक ‘वार’ सुरू झाले. यावेळी महाप्रसादाची पंगत सुरू होती. पारवे-घरडे यांच्यातील हमरी-तुमरी पाहून पंगतीत बसलेले नागरिकसुद्धा स्तब्ध झाले. प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वीच उपस्थितांनी घरडे यांना बाहेर निघून जाण्याची विनंती केली. तिकडे माजी आ. पारवे यांनासुद्धा शांत करीत खुर्चीवर बसविले. तब्बल अर्धातास चाललेल्या या राजकीय खडाजंगीबाबत मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
...अशी झाली सुरुवात
मंगळवारी (दि.२४) समारोपाच्या दिवशी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कीर्तन व गोपालकाल्यानंतर स्थानिकांची भाषणे झाली. महाप्रसाद सुरू होताच प्रमोद घरडे पंगतीमध्ये जेवणाकरिता बसले. त्याचवेळी माजी आ. सुधीर पारवे यांची एन्ट्री झाली. आयोजकांनी त्यांचा व्यासपीठावर सत्कार करीत भाषणाची संधी दिली. एकीकडे पंगत आणि दुसरीकडे पारवे यांचे भाषण सुरू होते. गोसेखुर्द, प्रकल्पग्रस्त, पुनर्वसन, केंद्र व राज्य शासनाने केलेली कामे, आमदार असताना खेचून आणलेल्या निधीचा पाढा वाचताना पारवे यांनी बेरोजगारीच्या विषयाकडे लक्ष वेधले. त्याचवेळी पंगतीत बसलेल्या प्रमोद घरडे यांनी हात धुत व्यासपीठाकडे आले. घरडे यांनी भाषण देत असलेल्या पारवे यांना ‘आमदार असताना तुम्ही दहा वर्षे काय केले?’ असा प्रश्न विचारला. त्यामुळे पारवे संतापले. त्यानंतर दोन्हीकडून सुरू झालेली शाब्दिक चकमक तब्बल अर्धातास चालली. या वादात घरडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा पाढा वाचला.