लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत परत एकदा ‘कोरोना’चे आकडे वाढण्यास सुरुवात झाली असून, प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांत नागपुरात विविध राजकीय आंदोलने व कार्यक्रमांचे आयोजन झाले. पुढील काही आठवडे शहरासाठी परीक्षेचे ठरणारे असून, यादरम्यान राजकीय आयोजनांमधील गर्दी धोकादायक ठरू शकते. या कार्यक्रमांमधली गर्दी लक्षात घेता ते कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नेत्यांनी संयम पाळत आंदोलने, कार्यक्रम टाळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांत नेहमीच ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडताना दिसतो. अनेकजण स्वत:चे छायाचित्र यावे यासाठी ‘मास्क’देखील घालत नाहीत. शिवजयंतीच्या कार्यक्रमात राज्याच्या नेत्यांपासून ते नगरसेवकांचे अशी अनेक छायाचित्रे ‘व्हायरल’ झाली आहेत. शिवाय प्रसारमाध्यमांसमवेत नेते संवाद साधतात तेव्हा आजूबाजूला गर्दी असते. या एकूणच बाबी कोरोनाची लागण होण्यासाठी पुरेशा आहेत. त्यामुळे गर्दीत कुठून कोरोनाची बाधा होईल याची कुठलीच शाश्वती नसते. नागपुरात राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या काही जणांनादेखील नेत्यानंतर कोरोनाची बाधा झाली असल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत आतातरी नेत्यांनी काही काळ संयम पाळावा व प्रत्यक्ष आंदोलन किंवा बैठकांचे आयोजन करू नये, असा सूर असल्याची माहिती राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’जवळ बोलताना सांगितली.
‘कोरोना’ने पोळले तरी...
शुक्रवारी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची पत्रपरिषद होती. मात्र खुद्द प्रभू हेच ‘मास्क’ काढून बोलत होते. विधान परिषदेचे सदस्य व भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास हेदेखील विनामास्कचे बसले होते. आश्चर्याची बाब म्हणजे व्यास यांना एकदा लागण होऊन गेली आहे. शहरातील अनेक आमदार, नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र यातील बरेच जण परत ‘ये रे माझ्या मागल्या’ करत ‘मास्क’ व ‘सोशल डिस्टन्सिंग’ शिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसून येत आहेत.
कार्यकर्ते मूग गिळून गप्प
पक्षांचे कार्यक्रम, मेळावे, गृहसंपर्क, नेत्यांचे स्वागत इत्यादी कार्यक्रमांना अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना इच्छा नसतानादेखील त्यात सहभागी व्हावे लागत आहे. जर नेत्यांचे बोलणे ऐकले नाही तर नाराजीची भीती आणि गर्दीमध्ये गेले तर कोरोना होण्याची धास्ती अशा दुहेरी संकटात ते अडकले आहेत.
या कार्यक्रमांत दिसली गर्दी
- कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागतासाठी विमानतळावर ‘कोरोना’चे सर्व नियम पायदळी तुडवत कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
- चिंचभुवन उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याच्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाला होता
- शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कॉंग्रेसच्या रॅलीत अनेक नेते, पदाधिकारी विना‘मास्क’चे उतरले होते
-वीजबिलांच्या मुद्द्यावरून भाजपतर्फे शहरात जागोजागी करण्यात आलेल्या आंदोलनात ना ‘मास्क’ होते ना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’
या लोकप्रतिनिधींना होऊन गेला ‘कोरोना’
-नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, अनिल देशमुख, सुनील केदार, नितीन राऊत, प्रवीण दटके, विकास ठाकरे, गिरीश व्यास, अभिजित वंजारी