श्रीमंत माने/ राजेश भोजेकर
नागपूर/चंद्रपूर :काँग्रेस व भारतीय जनता पक्षात सरळ लढत झाली की, काँग्रेसला विजय मिळतो, हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघता भाजपला यश देणारा तिसरा उमेदवार येत्या निवडणुकीत कोण असेल, हा प्रश्न चर्चेत आहे. चारवेळा खासदार, केंद्रात राज्यमंत्री राहिलेले हंसराज अहीर यांचे भाजपने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे प्रमुख म्हणून पुनर्वसन केल्यानंतर आता ही जागा जिंकण्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टाकली जाईल, अशीही चर्चा आहे.
हंसराज अहीर यांच्या चारवेळच्या विजयांमध्ये तिसऱ्या उमेदवारामुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरले. २००९ व २०१४ मध्ये वामनराव चटप तिसरे उमेदवार होते. गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांनीही एक लाखावर मते घेतली. पण, अहीर यांची मते वाढूनही ती विजयासाठी पुरेशी ठरली नाहीत. यावेळी हे मतविभाजन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या उमेदवारामुळे होईल का, हा प्रश्न चर्चेत आहे.
चंद्रपूरचे विद्यमान खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर हे राज्यातील काँग्रेसचे लोकसभेतील एकमेव प्रतिनिधी आहेत. त्यांनी हॅटट्रिक नोंदविणारे हंसराज अहीर यांचा पराभव केला. पण, मताधिक्य अवघे ४४ हजारांचे असल्याने सध्यातरी कागदावरच हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ब्रह्मपुरीचे आमदार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात सख्य नाही. बाजार समित्यांच्या निमित्ताने गटबाजी उफाळून आली आहे. तिचा फटका काँग्रेसला बसेल. तरीही सध्या काँग्रेसचेच पारडे जड आहे. धानोरकरांच्या विरोधात मुनगंटीवारांसारखा दुसरा तगडा नेता भाजपकडे नाही. त्यामुळे त्यांना भाजप केंद्रात पाठवू शकते, अशी चर्चा आहे. मात्र खुद्द मुनगंटीवार यावर अजिबात बोललेले नाहीत.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर व वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून बनलेल्या या मतदारसंघात स्वत: मुनगंटीवार (बल्लारपूर), संजीव रेड्डी बोदकुरवार (वणी) व संदीप धुर्वे (आर्णी) हे तीन आमदार भाजपचे आणि राजुऱ्याचे सुभाष धोटे व खासदारांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार अपक्ष असले तरी राज्यात सत्तांतरानंतर ते भाजपकडे झुकलेले आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघनिहाय मते : २०१९ :: मतदारसंघनिहाय मते : २०१४हंसराज अहीर - बाळू धानोरकर : हंसराज अहीर - संजय देवतळे - वामनराव चटप
राजुरा - ७३,८८० - १,०९,१३२ : ६४,४६५ - ४९,५३५ - ५८,२००चंद्रपूर - ७८,१८७ - १,०३,९३१ : ८९,३३२ - ३९,२३४ - ४३,२३८
बल्लारपूर - ६५,४८० - ९६,५४१ : ७७,२५४ - ४७,५०० - ३२,८८७वरोरा - ७६,१६७ - ८८,६२७ : ७३,५९९ - ४६,२१० - ३४,६०७
वणी - ९२, ३६६ - ९०,३६७ : ९२१०८ - ३८, २०७ - २८,०४३आर्णी - १,२६,६४८ - ६८,९५२ : १,१०,७४५ - ५०,९३१ - ७,२१७
टपाली मते - २०१६ - १९५७ : ५४६ - १६३ - २२१एकूण - ५,१४,७४४ - ५,५९,५०७ : ५,०८,०४९ - २,७१,७८० - २,०४,४१३
२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी १ लाख १२ हजार ०७९ मते घेतली.