लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्म या शब्दाने दचकायला होते. धर्म कुणालाही कळलेला नाही. हल्ली वेद आणि उपनिषदांना चांगले दिवस आले आहेत. भारतीय औदार्य कुठे गेले? आम्ही म्हणू तो धर्म, मानलं नाही तर भोसकतात, हे पाहून विशाद वाटतो. राजकीय नेते कधीच सहिष्णू नव्हते. पुस्तकांवर बंदी का घालतात तेच समजत नाही, असे रोखठोक मत ज्येष्ठ नाटककार व संमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले.९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे शुक्रवारी नागपुरात एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी एलकुंचवार म्हणाले, मला तुम्ही उद्घाटक म्हणून बोलावले ही चूकच केली. मी जरा स्पष्ट बोलतो ते तुम्हाला सहन करावे लागेल. आपण सहिष्णू कधीच नव्हतो. आता सगळ्याच शब्दांच्या व्याख्या बदलत आहेत. सहिष्णुता विसरलो असलो तर धर्मावर बोलण्याचा आपल्याला अधिकारच नाही. नाट्यधर्मी शब्द वापरायचा की नाही याचा मी विचार करतो. नाट्यधर्मी म्हटलं की वेगळी जबाबदारी येऊन पडते . जो निष्ठेने नाटक करतो तोच नाट्यधर्मी . बहुसंख्य लोक नाट्यकर्मी असतात, नाट्यधर्मी नाही. नाटक सर्वसमावेशक प्रकार. सर्व नाटककारांनी एकमेकांबाबत आदर बाळगावा . तुम्ही नाट्यकर्मी की नाट्यधर्मी याचा संमेलनाच्या माध्यमातून विचार करावा.
- कीर्ती शिलेदार यांनी प्रेमानंद गज्वी यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली.
- विशेष म्हणजे यावेळी शिंदेशाही पगडी ऐवजी प्रेमानंद गज्वी यांना फुले पगडी परिधान करण्यात आली.
- शिंदेशाही पगडी कीर्ती शिलेदार यांनाच परिधान करण्यात आली.