नागपूर : उपराजधानीत मतदानाला अजून दोन आठवड्यांचा अवधी असतानाच राजकीय पारा तापला आहे. शुक्रवारी भाजपने काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. संविधान व दीक्षाभूमीबाबत भाजपच्या भूमिकेबाबत तथ्यहीन माहिती पसरविणारा व्हिडीओ शेअर केल्याचा आरोप भाजपकडून लावण्यात आला. तर दुसरीकडे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप लावत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन केले.
भाजपतर्फे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी विकास ठाकरे यांच्याविरोधात तक्रारीचे पत्र लिहिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, लोकसभा निवडणूक प्रमुख आ. प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारीचे निवेदन देण्यात आले. या तक्रारीनुसार भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवेल व दीक्षाभूमीदेखील संपवून टाकेल अशा वक्तव्याचा व्हिडीओ विकास ठाकरे यांनी सोशल माध्यमांवर शेअर केला. ठाकरे यांनी जाती-धर्माच्या आधारे लोकांना उकसविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. असा व्हिडीओ शेअर करून त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करण्यासोबतच निवडणूक काळात सामाजिक सौहार्दाला धक्का लावण्याचा देखील प्रयत्न केल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर ‘मी दीक्षाभूमी बोलतेय’ या नावाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात काँग्रेसच्या वतीने जात व धर्माच्या आधारावर मते मागण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी काँग्रेसच्या उमेदवाराने कलम १२३ चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मला आचारसंहिता कळते, मी कुठलेही वक्तव्य केलेले नाहीयासंदर्भात विकास ठाकरे यांना संपर्क केला असता मला आचारसंहिता कळते व मी असा प्रकार किंवा वक्तव्य कधीच केलेले नाही, असा दावा त्यांनी केला. भाजपने याचा पुरावा दिला पाहिजे. भाजपला ४०० जागा मिळाल्या तर भाजप संविधान बदलेल, असे वक्तव्य त्यांचेच खासदार हेगडे यांनी केले होते. भाजपने तर त्यांच्याविरोधातदेखील तक्रार करायला हवी, असे ठाकरे म्हणाले.
मुत्तेमवार यांचीदेखील तक्रार, घराजवळ आंदोलनदरम्यान, कॉंग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप करत भाजपने त्यांचीदेखील निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. एका भाषणात मुत्तेमवार यांनी थेट मोदी यांच्या वडिलांबाबतच वक्तव्य केले. ही महाराष्ट्राची व देशाची राजकीय संस्कृती नाही. मुत्तेमवार यांच्याविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी शंकरनगरातील मुत्तेमवार यांच्या निवासस्थानाजवळ जोरदार निदर्शने केली. त्यांनी मुत्तेमवार यांच्याविरोधात घोषणा दिल्या. अखेर पोलिसांना काही कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावे लागले.
युवक काँग्रेसने आंदोलनाला म्हटले ‘तमाशा’दरम्यान, भाजयुमोच्या आंदोलनावरून युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत त्याला ‘तमाशा’ अशी उपमा दिली. भाजपला पराभव जवळ दिसत असल्याने जनतेचे लक्ष स्वत:कडे केंद्रित करून घेण्यासाठी हा प्रयत्न झाला आहे. नेत्यांना खुश करण्यासाठी आंदोलन करण्यात आले, अशी टीका युवक काँग्रेसकडून करण्यात आली.
पराभवाच्या भितीमुळे भाजप पदाधिकारी चवताळलेमहाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना शहरात मिळणारा प्रतिसाद बघून भाजपचे नेते चवताळले आहे. त्यामुळे त्यांनी भायुमोच्या कार्यकर्त्यांना माझ्या घराजवळ भ्याड कृत्य करण्यासाठी पाठवले. आमच्याकडेही हजारो कार्यकर्ते प्रत्येक मतदार संघात सक्रीय आहेत. त्यांना जर घटनेबद्दल कळाले असते असते तर त्यांना इथे पोहोचण्यापासून कोणी अडवू शकत नव्हता. मात्र आम्हाला शहराचे वातावरण शांत हवे आहे. या अवैध कृत्याबाबत आम्ही तक्रार दाखल केली आहे. संबंधीतांवर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे प्रतिपादन विलास मुत्तेमवार यांनी केले.