नागपूर : शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले असून, रात्री ठाकरेंविरोधात भाजयुमोकडून आंदोलन करत त्यांचे होर्डिंग्ज फाडण्यात आले. शिवाय, एरवी राजकीय टीकाटिप्पणीपेक्षा विकासावर भाष्य करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याचे वक्तव्य नागपुरातील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केले आणि काहीवेळातच सोशल माध्यमांवर त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात उद्धव ठाकरे यांचे होर्डिंग्ज फाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ परिसरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लागलेले मोठे होर्डिंग्ज फाडत त्यांच्या चेहऱ्याच्या भागाला काळे फासण्यात आले. नागपुरात येऊन उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले व आता उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा अपमान केला आहे. स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही व खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणीदेखील पदाधिकाऱ्यांनी केली.
व्हेरायटी चौकात आंदोलन
भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये संतापाची लाट असून, मंगळवारी सकाळी १० वाजता व्हेरायटी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सर्व आमदार उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी दिली.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी कृती : गडकरी
उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये ‘श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर ठाकरे यांनी जरूर चर्चा करावी. परंतु, अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, या शब्दांत नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध केला.
उद्धव यांचे मानसिक संतुलन बिघडले : बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील या मुद्द्यावरून ठाकरेंचा निषेध केला. उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते काय बोलत आहेत, याचे त्यांना भान नसते. एखाद्या गावगुंडासारखी त्यांची भाषा झाली आहे. उद्धव ठाकरेच कलंकित आहेत व त्यांनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. ते छोट्या मनाचे असून, त्यांची कीव येते. राजकीय मतभेद असले तरी विरोधक अशी भाषा वापरत नाहीत. अशा पद्धतीने विकृत टीका केल्याने त्यांच्याबद्दलचा थोडाबहुत आदरदेखील संपला आहे, असे बावनकुळे म्हणाले.