लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुक, व्हॉट्सअॅपमधून अॅन्टी प्रचार जोरात सुरू आहे. राजकीय पक्षाच्या सभांमधून सुद्धा एकमेकांविरुद्ध गरळ ओकली जात आहे. आता शहरात सुद्धा पोस्टरबाजीतून एकमेकांची लाज काढली जात आहे. काँग्रेस आणि भाजपाचे पोस्टर वॉर चांगलेच पेटले आहे. पण या अॅन्टी प्रचाराला मतदार साद घालतील का ? हा चिंतनाचा विषय आहे.शहरातील मुख्य रस्त्यांवर काँग्रेसने मोठमोठे पोस्टर्स लावून ‘लाज कशी वाटत नाही?’ असे भाजपाला उद्देशून पोस्टर्स लावले आहे. जीएसटी, नोटाबंदी, महागाई, बेरोजगारीवर भाजपाची पोस्टर्सच्या माध्यमातून चांगलीच मुस्कटदाबी केली आहे. ‘नोटबंदी आणि जीवघेणी जीएसटी लादून देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या तुघलकी सरकारला’, ‘महागाईने सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल करणाऱ्या सरकारला’, ‘सुशिक्षित तरुणांना पकोडे तळायला’ लाज कशी वाटत नाही? असा सवाल काँग्रेसने केला आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी अशा आशयाचे पोस्टर्स काँग्रेसने लावून भाजप सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत.काँग्रेसने सुरू केलेल्या या पोस्टरबाजीला भाजपाने सुद्धा प्रत्युत्तर देताना तगडी तयारी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या पोस्टर्सपासून काही अंतरावरच भाजपाचे ‘हो लाज वाटते, पण काँग्रेसची’ अशा आशयाचे पोस्टर्स शहरात झळकत आहे. पण भाजपाने काँग्रेसवर टीका करताना, भाजपाच्या कामाचाही आढावा यात घेतला आहे. भाजपाच्या पोस्टर्सवर ‘हो लाज वाटते, पण काँग्रेस सरकारची, ६० वर्ष राज्य करणाऱ्या कमिशनखोर सरकारची’, ‘६० वर्षे राज्य करणाऱ्या भ्रष्ट नाकर्त्या सरकारची’ असा टोलासुद्धा लगावला आहे. सोबतच आपल्या सरकारचे गुणगान सुद्धा केले आहे. मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, स्वच्छता अभियान, उजाला अभियान याची यशस्वीता आणि विकास कामांचा संदर्भ सुद्धा पोस्टर्समधून दिला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध नोटाबंदी हा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक होता, असा अभिमान भाजपाच्या पोस्टर्समधून झळकत आहे.सामान्य नागरिकांच्या फोटोचा वापर करून, जनतेच्या भावनांना यातून हात घातला आहे. राजकीय पक्षांची ही पोस्टरबाजी सामान्यांसाठी मनोरंजनात्मक ठरत आहे. अॅन्टी प्रचाराचा हा फंडा मतदारांवर किती प्रभावी ठरेल? हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल.