काँग्रेसचे मनोरे कोसळले, मनपा निवडणुकीआधीच मनोबल खचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 11:28 AM2022-03-11T11:28:43+5:302022-03-11T11:35:20+5:30
संघापासून भाजपपर्यंत सर्वांनीच नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर फोकस केला आहे. गडकरी-फडणवीस यांची जोडी ताकदीने मैदानात उतरली आहे.
कमलेश वानखेडे
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता काबीज केल्याने नागपुरातही भाजपचा उत्साह वाढला आहे. गेल्या १५ वर्षांत महापालिकेतील भाजपची सत्ता उलथून फेकण्यासाठी कंबर कसणाऱ्या काँग्रेसजनांचे मनोबल पुरते खचले आहे. कितीही जोर लावला तरी भाजपला नमविणे सोपे नाही, संघभूमीत तर आणखीनच कठीण आहे, असे निराशेचे सूर काँग्रेसजन आळवू लागले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे महत्त्व भाजपसाठी किती आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. संघापासून भाजपपर्यंत सर्वांनीच नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर फोकस केला आहे. गडकरी-फडणवीस यांची जोडी ताकदीने मैदानात उतरली आहे.
येथे सत्तेचा चौकार मारण्यासाठी भाजप शक्ती पणाला लावणार आहे. काँग्रेससाठी नागपुरात तशीही लढाई सोपी नाही. टक्कर देण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली. आपसात लढण्याऐवजी एक होऊन लढू, अशी समजदारीची भाषा ठेच लागलेले काँग्रेस नेते करू लागले आहेत. मात्र, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तरांचल व मणिपूर या पाच राज्याच्या निकालांनी काँग्रेस नेत्यांसह लढण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. इच्छुक कार्यकर्ते दिवसभर एकमेकांना फोन करून चिंता व्यक्त करीत होते. काही कार्यकर्ते तर काँग्रेस नेत्यांनाच दोष देत होते.
या निकालांनी भाजपने होळीपूर्वीच गुलाल उधळला. असाच गुलाल महापालिकेच्या निवडणुकीतही उधळू, असा दावा करीत भाजप नेते काँग्रेस नेत्यांना दिवसभर डिवचताना दिसले.
भाजपमधील आऊटगोईंग थांबणार
दक्षिण नागपुरातील छोटू भोयर व सतीश होले या दोन नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी ही जमेची बाजू होती. भाजपमधील आणखी काही नगरसेवक व वजनदार कार्यकर्ते अशीच वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत होते. काँग्रेस नेत्यांशी प्राथमिक चर्चाही आटोपल्या होत्या. मात्र, पाच राज्याच्या निकालाने अजूनही भाजपचीच हवा असल्याचा मेसेज गेला. त्यामुळे आता भाजपमधील आऊटगोईंग थांबण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेत्यांचा कस लागणार
या निकालांनी भाजपचा पगडा कायम असल्याचे पुन्हा एकदा नागरिकांच्या मनावर कोरल्या गेले. त्यामुळे नागरिकांच्या मनातून भाजपची पाटी कोरी करण्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. संघटन बळकट करून थेट गल्ली, वस्त्यात शिरून ताकदीने बाजू मांडावी लागेल. काँग्रेस नेत्यांनी हे ‘मॅनेजमेंट’ वेळीच केले नाही तर कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत जाण्याचा धोका आहे.