गडकरींच्या धापेवाड्यात राजकीय उलथापालथ; काॅंग्रेसच्या सरपंचच पतीला घेऊन भाजपात आल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 10:16 PM2024-02-07T22:16:38+5:302024-02-07T22:17:11+5:30
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मंगला राजेश शेटे अवघ्या सहा मताने भाजपाच्या उमेदवार निशा सुधाकर खडसे यांना पराभूत केले होते.
कळमेश्वर : धापेवाडा ग्राम पंचायतीच्या काँग्रेसच्या सरपंच मंगला शेटे यांनी बुधवारी पारडसिंगा येथील महिला मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यामुळे धापेवाड्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. प्रवेशाच्या निमित्ताने का होईना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाड्यात भाजपचा झेंडा रोवण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यश आले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी मंगला शेटे यांचे पती माजी उपसंरपंच राजेश शेटे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता.
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मंगला राजेश शेटे अवघ्या सहा मताने भाजपाच्या उमेदवार निशा सुधाकर खडसे यांना पराभूत केले होते. या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाचे दहा सदस्य, भाजपा समर्पित गटाचे सहा सदस्य तर एक सदस्य अपक्ष म्हणून निवडून आले होते. सरपंच मंगला शेटे व पाच सदस्यांवर अतिक्रमण केले म्हणून यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी तक्रार भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आली होती. तशीच तक्रार काँग्रेसकडून भाजपा समर्थित गटाच्या सहा सदस्यांविरुद्ध दाखल करण्यात आली होती.
आपले पद जाईल या भितीने शेटे यांनी भाजपात प्रवेश केला असल्याची राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. तर आपण विकास कामांसाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले. शेटे यांच्यासोबत सध्यातरी काँग्रेसचे एकही सदस्य गेलेले नाहीत. मात्र, भविष्यात दोन ते तीन सदस्य येतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे. शेटे यांच्या भाजप प्रवेशाने काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षप्रवेशामागे भाजप नेते डॉ. राजीव पोतदार, दिलीप धोटे, डॉ. मनोहर काळे, रवी पवार, रमेशजी राजगुरे, मंगेश कोठाडे, देवेन मानकर आदींची महत्वाची भूमिका असून हे सर्व प्रवेशाच्यावेळी उपस्थित होते.
असा आहे धापेवाड्याचा राजकीय इतिहास
धापेवाडा ग्रामपंचायतच्या १९४८ ते २०२३ या ७५ वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेसचे ९ तर भाजपा समर्पित गटाचे ८ सरपंच्यांनी कारभार बघितला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वडील जयराम गडकरी यांनीही येथे सरपंच म्हणून वर्षभर कारभार पाहिला आहे. येथे काँग्रेसने ४० वर्षांहून अधिक काळ दबदबा कायम ठेवला. २०१८ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी सत्तारूढ भाजपाची सत्ता उलथवून टाकीत कॉग्रेसला निर्विवाद बहुमत दिले होते. या ग्रामपंचायत मध्ये कॉग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार सुरेश मारोतराव डोंगरे यांनी १७५० मतांनी विजय संपादन केला होता. तसेच १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १६ सदस्य सुद्धा काॅंग्रेस समर्थीत गटाचे विजयी झाले होते. काॅंग्रेसने हिच घोडदौड कायम ठेवत २०२३ च्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सरपंचासह दहा सदस्य निवडून आणले.