नगराध्यक्षपदाची निवडणूक : भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, शेकापची गोचीकाटोल : नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह एकूण नऊ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आल्याने मंगळवारी सकाळी नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यपदाची निवडणूक पार पडली. त्यात शेतकरी कामगार पक्षाचे संदीप वंजारी आणि ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलेल्या लक्ष्मी जोशी यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. संदीप वंजारी हे मतदानाच्यावेळी सभागृहात अनुपस्थित होते. त्यामुळे जोशी यांनी नऊ मते मिळवून विजय संपादन केला. या राजकीय उलथापालथीमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत शेकापची गोची केली.काटोल नगगर परिषदेच्या नगरसेवकांची एकूण संख्या २१ आहे. सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे १२ आणि जनविकास आघाडीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. मध्यंतरी जनविकास आघाडीतील पाच नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर, चार नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राहिले. दरम्यान, नगर विकास मंत्रालयाने एका प्रकारणात शेकापच्या १० नगरसेवकांना अपात्र ठरविले. त्यात नगराध्यक्ष राहुल देशमुख यांचाही समावेश होता. अपात्र ठरविण्यात आलेल्या एका नगरसेवकाचे निधन झाले. त्यामुळे शेकापच्या नगरसेवकांची संख्या तीनवर आली असून, तिन्ही नगरसेवक हे पोटनिवडणुकीत निवडून आलेले आहेत. परिणामी, मंगळवारी सकाळी ११ वाजता नगर परिषदेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रि येला सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून संदीप वंजारी आणि जनविकास आघाडीकडून लक्ष्मी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आवाजी पद्धतीने हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदनात चरणसिंह ठाकूर, समीर उमप, किशोर गाढवे, कमल इखार, रेखा उके, लता कुमरे, धर्मराज शेरकर, राजेश वानखेडे आणि स्वत: लक्ष्मी जोशी यांनी मतदान केले. रिता सावरकर या तटस्थ राहिल्या. शेकापचे संदीप वंजारी आणि जनविकास आघाडीचे गणेश चन्ने हे दोन नगरसेवक अनुपस्थित होते. त्यामुळे संदीप वंजारी यांना एकही मत मिळाले नाही. पीठासिन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी (महसूल) अविनाश कातडे यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले व स्वीकृत सदस्य जितेंद्र तुपकर सभागृहात हजर होते. जोशी यांना विजयी घोषित केल्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढून जल्लोष केला. (तालुका प्रतिनिधी)
काटोलमध्ये राजकीय उलथापालथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2016 3:12 AM