नागपूर : होळीच्या दिवशी काँग्रेस व भाजपच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये राजकीय शिमगा रंगला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या होळीमध्ये सत्तेत बसलेल्यांना सदबुद्धी यावी, अशी आपली होळी मातेला प्रार्थना आहे, असे वक्तव्य करीत सत्ताधारी भाजपवर गुलाल फेकला. तर पटोलेंनी होळीला टीका करू नये, पंचमीला उत्तर देऊ, असा इशारा देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘बलून’ हाणला.
पटोले म्हणाले, काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्येच आम्ही असे ठरवले आहे की, जे जे भाजपच्या विरोधात लढायला तयार असतील, त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊ. भाजप ने लोकशाही धोक्यात आणली आहे. न्यायव्यवस्था आणि प्रशासनामध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे, असा आरोप पटोले यांनी केला. भाजप लोकशाहीमध्ये जी क्रूरता निर्माण करत आहे, त्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यास कोणालाही विरोध नसावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पटोलेंच्या टीकेवर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, नाना पटोले यांनी होळीच्या दिवशी टीका टिप्पणी करू नये. आम्ही पंचमीला उत्तर देऊ. त्यांचा पक्ष फुटतो आहे. तो थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. गोंदिया जिल्ह्यातील दहिवले हा कॉंग्रेसचा मोठा नेता भाजपात आला, त्यामुळे कॉंग्रेस फुटत आहे. त्यासाठी होळीला नमस्कार करून कॉंग्रेस फुटू नये अशी प्रार्थना त्यांनी करावी, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठे करण्यासाठी किती पैशाचा गैरवापर होतो, हे सर्वांना माहिती आहे. तिन्ही पक्ष त्यांच्या कार्यकर्त त्याच्या सभेला पाठवितात, उद्धव ठाकरेंच्या मागे सहानभूती मिळेल व त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला होईल. परंतु त्यांना सहानभूती मिळणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.