आनंद डेकाटेनागपूर : “एकमेकांवर आरोप करण्याची संधी अनेकवेळा असते. मात्र, जेव्हा धार्मिक तेढ वाढेल, अशी शक्यता असते. तेव्हा, राजकारण्यांनी काळजी घ्यावी,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नागपुरात दिला.शरद पवार शनिवारी नागपूर दौऱ्यावर होते. तेव्हा प्रेस क्लबतर्फे आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी संभाजीनगर येथील घटनेवरही भाष्य केले. ते म्हणाले, “अलीकडच्या काळात संभाजीनगर व इतर ठिकाणी काही प्रकार घडले आहेत. येथे धार्मिक स्वरूप आहे की काय? अशी चिंता वाटण्याची स्थिती होती.”“यावर काही राजकीय लोकांनी मतं व्यक्त केली आहेत. पण, या सगळ्यासंबंधी अधिक चर्चा होणं योग्य नाही. आता परिस्थिती निवळली आहे. तसेच, हा धार्मिक प्रश्न आहे. अशीच परिस्थिती पुढे राहणार नाही, याची खबरदारी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी करावी,” असा सल्ला शरद पवारांनी राजकीय नेत्यांना दिला आहे.
“एकमेकांवर आरोप करण्याची संधी अनेकवेळा असते. मात्र, जेव्हा धार्मिक तेढ वाढेल, अशी शक्यता असते. तेव्हा, राजकारण्यांनी काळजी घ्यावी,” असं शरद पवारांनी सांगितलं. दरम्यान, शरद पवार यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नागपुरातील गडकरींच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली. दीड महिन्यात नागपुरात शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात ही दुसरी भेट आहे. या भेटीत ऊसशेती, साखर कारखानदारी आणि शेतकरी या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.