देशात द्वेष, सूड व नकारात्मकतेने भरलेले राजकारण : उर्मिला मातोंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 10:52 PM2019-08-22T22:52:30+5:302019-08-22T22:56:40+5:30
देशात सध्या द्वेष, सूड आणि नकारात्मकतेने भरलेले राजकारण आपल्यासोबत खेळले जात आहे.त्यामुळे देशात द्वेषाचे राजकारण हवे की सद्भावनेचे, याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री व काँग्रेस नेता उर्मिला मातोंडकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात सध्या द्वेष, सूड आणि नकारात्मकतेने भरलेले राजकारण आपल्यासोबत खेळले जात आहे. अशावेळी प्रेम आणि सद्भावना जोपासणारा, सगळ्यांना जोडणारा आपला भारत आपल्यापासून दूर जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात द्वेषाचे राजकारण हवे की सद्भावनेचे, याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री व काँग्रेस नेता उर्मिला मातोंडकर यांनी केले.
बहुजन विचार मंचच्यावतीने ७० वर्षाच्या कालखंडात काँग्रेस नेत्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘आझादी से आझादी की ओर’ या नाटकाचे सादरीकरण गुरुवारी वसंतराव देशपांडे सभागृहात झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित उर्मिला मातोंडकर यांनी भाष्य केले. त्यांनी मराठीतून आपले मनोगत मांडले. ७३ वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हा देश काहीच नव्हता. त्या देशाला हळूहळू का होईना महासत्ता बनविण्यापर्यंत जवाहरलाल नेहरू यांचे योगदान मोठे राहिले आहे. स्वातंत्र्य लढ्यात ११ वर्षे तुरुंगात घालविणाºया या महान नेत्यावर आज हीन भाषेत चिखलफेक केली जाते, हे वेदनादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जोरात ओरडून बोलणाºयाकडे सर्वांचे लक्ष जाते तसे आज झाले आहे. ओरडून ओरडून खोटे सांगितले जात आहे पण प्रत्येक चमकणारी वस्तू जशी सोने नसते तसे ओरडून सांगितलेली प्रत्येकच गोष्ट सत्य नसते.
इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली होती, त्याच नीतीचा वापर करून लोकांमध्ये द्वेष पसरविला जात असल्याची टीका त्यांनी केली. बालभारतीच्या पुस्तकामधील बंधूभावाची प्रतिज्ञा कुठे हरविली हा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ निर्माण झाली आहे. हा निर्वाणीचा इशारा आहे. काँग्रेस पक्ष नाही, प्रेम आणि सद््भावना जोपासणारी विचारधारा आहे व ती अखंडित आहे, अबाधित राहणार आहे. हा सकारात्मकतेचा विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री रणजित देशमुख, अनिस अहमद, आमदार प्रकाश गजभिये, प्रफुल गुडधे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, यादवराव देवगडे, एस. क्यू. जामा, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, माजी महापौर कुंदाताई विजयकर, पारस बनोदे, प्रज्ञा बडवाईक तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालन मोहम्मद सलीम यांनी केले तर नितीन कुंभलकर यांनी आभार मानले.
धमन्यात कुठले रक्त आहे, असे विचारण्याचा प्रकार
७३ वर्षाच्या काळात काँग्रेस नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे आपला देश महासत्ता होण्याच्या मार्गापर्यंत पोहचला आहे. असे असूनही काँग्रेसने ७० वर्षात काय केले, असा प्रश्न विचारला जातो. ७० वर्षात काँग्रेसने काय केले असे विचारणे म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीच्या धमन्यात कुठले रक्त आहे, असे विचारण्यासारखा थट्टाजनक प्रकार असल्याची खरमरीत टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली.
काँग्रेस नेत्यांच्या कार्याचा आढावा
बहुजन विचार मंचतर्फे ‘आझादी से आझादी की ओर’ या नाटकात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य लढ्यापासून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत काँग्रेस नेत्यांच्या ७० वर्षाच्या कामाचा धावता आढावा घेतला आहे. लेखन व दिग्दर्शन सलीम शेख यांचे आहे. कार्यक्रमाचे संयोजन बहुजन विचार मंचचे नरेंद्र जिचकार यांनी केले. नाटकात पूजा पिंपळकर (भारतमाता), तुषार पौनीकर (राहुल गांधी), प्रशांत मंगदे (महात्मा गांधी), अनिल पालकर (पं. नेहरू), प्रशांत लिखार (सरदार पटेल व नरसिंहराव), रवी पाटील (डॉ. आंबेडकर), इंदिरा गांधी (पूजा मंगळमूर्ती), महेश पातुरकर (लाल बहादूर शास्त्री), प्रशांत खडसे (मनमोहन सिंह), मंजुश्री डोंगरे (सोनिया गांधी), गौतम ढेंगरे (राजीव गांधी) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. संगीत चारुदत्त जिचकार यांचे होते. नेपथ्य सचिन गिरी, प्रकाश व्यवस्था मिथून मित्रा व सूत्रधार हेमंत तिडके व अश्विनी पिंपळकर होते.