नागपूर : राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील तापलेल्या राजकारणाचे पडसाद नागपुरातदेखील उमटले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने कारवाईचा विरोध करत केंद्राविरोधात निदर्शने केली. यादरम्यान, स्वस्त विजेच्या मागणीवरून आम आदमी पक्षानेदेखील आंदोलन केले.
भाजपने मलिकांचा पुतळा जाळला, राष्ट्रपती लावण्याची मागणी
नवाब मलिक यांच्याविरोधात नागपुरात भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चातर्फे झाशी राणी चौकात आंदोलन करण्यात आले. देशद्रोही लोकांसमवेत हातमिळवणी करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने राजीनामा घ्यावा. तसेच मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
आंदोलनाला शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ.कृष्णा खोपडे, आ.मोहन मते, आ.विकास कुंभारे, माजी आमदार डॉ मिलिंद माने, भाजयुमो शहराध्यक्ष पारेंद्र पटले प्रामुख्याने उपस्थित होते. राज्याच्या मंत्र्याचे असे प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी शासनाने तातडीने त्यांना पदावरून दूर करायला हवे होते. त्यांच्याविरोधातच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी कृष्णा खोपडे यांनी केली. जोपर्यंत मलिक स्वत: राजीनामा देत नाहीत किंवा त्यांना पदावरून काढले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा प्रवीण दटके यांनी दिला. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.
ईडीचा दुरुपयोग होत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
नवाब मलिक यांच्यावरील कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार ईडी व सीबीआयचा दुरुपयोग करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाची सत्ता यावी यासाठी कट रचला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी बॅरीकेड्स पार करत चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. या वेळी प्रदेश महिला आयोग सदस्य आभा पांडे, अनिल अहिरकर, माजी आमदार दीनानाथ पडोले, शेखर सावरबांधे, दिलीप पनकुले, ईश्वर बालबुधे, वर्षा शामकुळे, चिंटू महाराज, नूतन रेवतकर प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वस्त विजेसाठी आपचे आंदोलन
वीजदर कमी करणे तसेच लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी आपतर्फे संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजित सिंह, भूषण ढाकूलकर, अमरीश सावरकर, अशोक मिश्रा, प्रतीक बावनकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात वीजदर कमी करणे, थकबाकीदारांच्या जोडण्या न कापणे, थकबाकीवर व्याज न घेणे तसेच वीज कंपन्यांचे ऑडिट करण्याचीदेखील मागणी करण्यात आली.