Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणाविषयी त्यांचे रोखठोक मत नेहमीच उघडपणे मांडत असतात. राजकारणाविषयी त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांची याआधीही जोरदार चर्चा झाली आहे. अशातच आता नागपूर येथे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण असा धंदा ज्यात शिव्या खायची तयारी ठेवावी लागते असं विधान केलं आहे. तसेच महिलांसाठी आम्ही योजना देत असू तर तुम्हाला पोटदुखी होण्याचे कारण काय? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला आहे.
शुक्रवारी वीजनिर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती खापरखेडा भव्य कामगार मेळावा आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. “मी वर्ष ३५ राजकारणात विविध पदावंर आहे. कर्तव्यपूर्ती केल्यानंतर जनतेने आमचे आभार मानन्याचा निर्णय घेतला. ३५ वर्षांत मी असं पहिल्यांदा पाहतोय की, ज्यांच्यासाठी काम केले, ते लोक आभार मानन्यासाठी पुन्हा बोलवत आहेत. कारण राजकारण असा धंदा आहे जिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्या खाण्याची तयारी असेल तरच तुम्ही जनतेला न्याय देऊ शकता. कारण या शिव्या नसतात तर सामान्य माणसाच्या अपेक्षा असतात”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“वीज कंत्राटी कामगारांचे कल्याण करायचे असेल तर बावनकुळे-फडणवीस जोडी असेल तरच हे कल्याण होऊ शकते. २०१९ साली चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यामुळे कंत्राटी कामगारांचा फायदा झाला. आताही बावनकुळे यांनीच पुढाकार घेतल्यामुळे कंत्राटी कामगाराचा लाभ होत आहे. ऊर्जा खाते चालवत असताना बावनकुळेच माझे मार्गदर्शक आहेत”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचे सहकारी उच्च न्यायालयात गेले आहेत, असेही फडणवीसांनी सांगितले. आमच्या बहिणींची योजना बंद करायची भाषा कराल, तर पुढचे पाच वर्ष सोडाच पण २५ वर्ष तुम्ही सत्तेत येणार नाहीत. आम्ही जर महिलांसाठी, बहिणींसाठी योजना देत असू तर तुम्हाला पोटदुखी होण्याचे कारण काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केला.
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. "काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षणाविरोधात भूमिका मांडली. त्यांना वाटले आपण दुसऱ्या देशात बोललो तर कुणाला कळणार नाही. पण आजकाल मसणातही मिडिया असतो. हे त्यांना बहुधा माहिती नसावे. त्यांनी आरक्षण कसे बंद करणार याबाबतचा कार्यक्रम सांगितला आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.