नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील अस्वस्थतेबाबत परखडपणे भाष्य करत अनेक नेत्यांच्या वर्मावरच बोट ठेवले आहे. राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा महासागर असून येथे बहुतांश नगरसेवकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक जण अस्वस्थ असतो, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. नागपुरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राजस्थानच्या विधिमंडळात मी एकदा उदाहरण दिले होते. राजकारणात जवळपास प्रत्येक जण दु:खी आहे. जो नगरसेवक बनतो त्याला आमदारपदाची संधी मिळाली नाही म्हणून तो दु:खी असतो, आमदाराला मंत्रिपद मिळालेे नाही म्हणून तो दु:खी असतो, तर मंत्र्याला चांगले खाते मिळाले नाही म्हणून तो दु:खी असतो. अगदी मुख्यमंत्रीदेखील दु:खी असतात. हायकमांड कधीही पद सोडण्याला सांगेल याची भीती असते, असे गडकरी म्हणाले.
जो युद्धभूमीतून पळ काढतो तो हरतो!
समाजात आपण कुठल्याही क्षेत्रात असलो तरी समस्या असतातच. आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. मात्र असे असतानाही जीवनात आनंद व समाधान निर्माण करणे आवश्यक आहे. युद्धभूमीत हारल्यानंतर कुणीच संपत नाही, जो युद्धभूमीतून पळ काढतो तो हरतो. विशेषत: जास्त विचार करणारे लोक स्वत:च्या विद्वत्तेमुळे अस्वस्थ करून घेतात. त्यांच्या जीवनात समाधान नसते, अतृप्तता असते. अनेकदा अहंकार नुकसान करतो. जो आत्मपरीक्षण करतो त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात, याकडे गडकरींनी लक्ष वेधले.