भाऊ कदम : नाट्य परिषदेच्या कारभारावर व्यक्त केला संताप नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर नाटकाचे नव्हे तर राजकारणाचे प्रयोग होतात. नाट्य परिषदेला समर्पित रंगकर्मींशी काही घेणे-देणे नाही. म्हणूनच नाट्य कलावंत अशा संमेलनांकडे फिरकत नाहीत, अशी टीका प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केली. नवरंग क्रिएशन्सतर्फे गुरुवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाट्य परिषदेच्या एककल्ली कारभारावर संताप व्यक्त करीत भाऊ कदम पुढे म्हणाले, अशा संमेलनांमध्ये नाट्य परिषदेचे अधिकारी आपल्या नातेवाईकांनाच पुढे-पुढे करतात. सभागृहातील समोरच्या अनेक रांगा व्हीआयपींसाठी राखीव असतात. हे व्हीआयपी कोण आहेत? ज्या माय-बाप प्रेक्षकांमुळे नाटक चालते त्यांना या व्हीआयपी जागेवर का बसवले जात नाही? सेलिब्रिटी कलावंत नाटकाला येत नाहीत, असा आरोप केला जातो. परंतु संमेलनाची तारीख ठरवताना किती कलावंतांना विश्वासात घेतले जाते. प्रत्येकाचे वेळापत्रक निश्चित असते अन् मधेच हे संमेलन उभे राहते. तारखांचे पूर्व नियोजन का केले जात नाही? उगाच कलावंतांना दोष देऊन उपयोग नाही, याकडेही भाऊ कदम यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी) कंत्राटदाराला नेपथ्याचे काय कळते? राज्यात आधीच नाट्यगृहांची स्थिती फार वाईट आहे. त्यातही नाट्यगृह बांधताना नेपथ्याच्या दृष्टीने अजिबात विचार करण्यात न आल्याने नाटक सादर करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. असे नाट्यगृह बांधताना सर्व कंत्राटदारावर सोपवले जाते. पण, त्याला नाटकाच्या नेपथ्याबाबत काहीच माहीत नसते. त्यामुळे यापुढे नाट्यगृह बांधताना नेपथ्याचा अभ्यास असलेल्या व्यक्तीचा सल्ला घेतला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही भाऊ कदम यांनी व्यक्त केली.
नाट्य संमेलनात राजकारणच जास्त
By admin | Published: April 28, 2017 2:59 AM