आंबेडकर महाविद्यालय राष्ट्रीय परिषद : रेनी बोर्गीज यांचे प्रतिपादननागपूर : परागीकरणाच्या गरजा पशु-पक्षी आणि कीटक यांच्याकडून होत असते. फुलं आणि फळे यांच्या उत्पादनात परागीकरण याचा मोठा वाटा असून हा एक नैसर्गिक भाग आहे. यात मानवी हस्तक्षेप सध्या कमी असला तरी मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परागीकरण घडवून आणणारे घटक नामशेष होत आहे. परिणामी नैसर्गिक परागीकरणच धोक्यात आले आहे, असे प्रतिपादन बंगळुरु येथील इकॉलॉजिकल सायन्सेस सेंटरचे अध्यक्ष डॉ. रेनी बोर्गीज यांनी येथे केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीतर्फे केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र नागपूर व राष्ट्रीय विज्ञान परिषद नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनॅशनल इयर आॅफ पल्सेस-२०१६’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त ‘इनोव्हेशन इन अॅग्री-बायोसायन्सेस’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिषदेचे उद्घाटन स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्चचे संचालक डॉ. केशव क्रांती, डॉ. सुधोमय मंडल, डॉ. अलका चतुर्वेदी, प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, संचालक डॉ. मालती रेड्डी, डॉ. डी. बेगडे, प्रो. सुभाष सोमकुंवर, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, व्ही.व्ही. चिकाटे व्यासपीठावर हजर होते. डॉ. शरद निंबाळकर यांनी हरित क्रांतीवर भर दिला. कृषी क्षेत्रातील नैसर्गिक घटकांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले.प्रास्ताविक प्रो. सुभाष सोमकुंवर यांनी केले. डॉ. वर्षा देशपांडे यांनी संचालन केले. डॉ. भूमी मेहरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
मानवी हस्तक्षेपामुळे परागीकरण धोक्यात
By admin | Published: February 27, 2016 3:23 AM