लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील ८४ पैकी ८२ जागांसाठी शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात करण्यात आली. यातील दाेन जागांवर उमेदवार अविराेध निवड करण्यात आल्याने त्या जागांसाठी मतदान घेण्यात आले नाही. या १० गावांमधील एकूण १५,४४२ मतदारांपैकी दुपारी १.३० वाजेपर्यंत ४६.९४ टक्के आणि दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६६.९३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हाेता.
पारशिवनी तालुक्यातील आमगाव, बाेरी (सिंगारदीप), इटगाव, खंडाळा (घटाटे), खेडी, माहुली, नवेगाव (खैरी), निमखेडा, पिपळा व सुवरधरा या १० ग्रामपंचायतींमधील एकूण ८४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात माहुली व नवेगाव (खैरी) येथील प्रत्येकी एक जागा अविराेध निवडून आल्याने उर्वरित ८२ जागांसाठी मतदान घेण्यात आले. त्यासाठी एकूण ३१ मतदान केंद्रे होती, शिवाय, १३६ मतदान कर्मचाऱ्यायांची नियुक्ती केली हाेती. या १० गावांमधील मतदारांची एकूण संख्या १५,४४२ असून, ८,२२० पुरुष व ७,२२२ महिला मतदारांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी सकाळी ११ वाजेपर्यंत ३२ टक्के, तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हाेता.
शेतीची कामे असल्याने सकाळी मतदानाचा वेग अधिक हाेता. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशासनाने सॅनिटायझेशनची व्यवस्था केली हाेती. मतदारांना मास्क, रुमाल अथवा दुपट्टा नाका-ताेंडाला बांधल्याशिवाय आत प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे मतदारांची काहीशी तारांबळ उडाली हाेती. ही मतदान तहसीलदार वरुणकुमार सहारे यांच्या मार्गदर्शनात, तर प्रक्रिया मनोज सहारे, विलास लथाड, विजय नाईक, आर.आर. सयाम व कैलास अल्लेवार यांच्या नेतृत्वात शांततेत पार पडली. पाेलीस निरीक्षक संताेष वैरागडे यांच्या नेतृत्वात सर्वच ठिकाणी पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.