नागपूर: अगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी दूर केल्या जातील. मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी २०० कुटुंब वास्तव्यास असलेल्या मोठ्या फ्लॅट स्कीममध्ये मतदान केंद्र ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
काही मतदान केंद्रावर मतदारांची संख्या ४०० तर काही ठिकाणी १३००ते १४०० आहे. त्यामुळे काही केंद्रावर गर्दीवर असते. सर्वच केंद्रावर समान मतदार संख्या करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मतदान केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. मोठ्या फ्लॅट स्कीममध्येच मतदान केंद्र देण्याचा प्रयत्न असून यासाठी संबंधित फ्लॅटमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांसोबत चर्चा करू, सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतला जाईल. सोबतच बीएलओ घरोघरी जात असून मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहे.
ज्यांची नावे चुकीचे डिलीट झाली, त्यांची पुन्हा समाविष्ट करण्यात येत आहे. काहींचे नावे दोन ठिकाणी असल्याची माहिती येत आहे. तर मागील निवडणुकीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. २५ जुलैपर्यंत मतदार नोंदणीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे ज्यांनी नावे डिलीट झाली असतील त्यांनी ती समाविष्ट करण्यासोबत नवीन मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन विपीन इटनकर यांनी केले आहे.