लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षी ढगाळ वातावरणामुळे त्यात आणखी भर पडली होती. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्याचा अनुभव आला. अनेकांना सकाळचे वातावरण प्रदूषित जाणवले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील सिव्हिल लाईनच्या प्रदूषणाची मात्रा नोंदविली. यात रात्री १२ वाजता सिव्हिल लाईन भागातल्या प्रदूषणाची मात्रा प्रचंड वाढलेली दिसली. प्रदूषण मानकानुसार सिव्हिल लाईनचे रात्रीचे वातावरण ‘व्हेरी पुअर’ म्हणून नोंदले गेले. रात्री १२ नंतर सिव्हिल लाईनचा एअर क्वॉलिटी इंडेक्स ३२६ वर गेला होता. जो मानवासाठी अपायकारक ठरतो.देशामध्ये १०२ शहरांची वायुप्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट आहे. यात नागपूरचासुद्धा समावेश आहे. शहराच्या वायुप्रदूषणात सर्वात मोठा घटक हा पार्टिक्युलेट मॅटरचा आहे. पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे छोटे छोटे धुळ कण जे २.५ मायक्रॉनपेक्षा कमी व २.५ ते १० मायक्रॉनपर्यंत असतात. यात सल्फरडाय आॅक्साईड, नायट्रोजनडाय आॉक्साईड, अमोनिया, शिसा, आर्सेरिक, निकल, ओझोन, कार्बन मोनोक्साईड असा १२ घटकांचा समावेश असतो. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे वातावरणातील वायुप्रदूषण या घटकांच्या आधारेच नोंदविते. त्यानुसार शहराचा एअर क्वॉलिटी इंडेक्स नोंदविण्यात येतो. गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या दिवशी शहरातील एअर क्वॉलिटी इंडेक्स प्रदूषण नियंत्रण मंडळ नोंदविले. यात २०१६ मध्ये एअर क्वॉलिटी इंडेक्स १३८ पर्यंत पोहचला होता. २०१७ मध्ये १८२ पर्यंत पोहचला होता. २०१८ मध्ये २२२ व रविवारी मध्यरात्री नागपूर शहरातील सिव्हिल लाईन्सचा एअर क्वॉलिटी इंडेक्स ३५३ एवढा नोंदविण्यात आला. एअर क्वॉलिटी इंडेक्सचा आकडा २०० च्या वर गेल्यास प्रदूषणाची स्थिती गंभीर होते.शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बांधकामामुळे पार्टिक्युलेट मॅटरची मात्रा जास्त आहे. त्याचबरोबर शहराच्या परिसरात थर्मल पॉवर प्लॅन्टसुद्धा आहे. त्यामुळे शहरात पार्टिक्युलेट मॅटर आधीच आहे. अशात फटाक्यांच्या फुटण्यामुळे यात आणखी भर पडते.दिवाळीत फॅन्सी फटाके मोठ्या प्रमाणात फोडण्यात येतात. हे फटाके हवेत प्रदूषण पसरवतात. त्याचा थेट परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. फॅन्सी फटाके रसायनांचा वारेमाप वापरामुळे अधिक आकर्षक दिसतात. कारण जेवढे जास्त रसायन, तेवढे रंग अधिक असतात. मात्र, हे फुटल्यानंतर वातावरणातील कार्बन आणि सल्फरचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
म्हणून झाले वातावरण अधिक प्रदूषितरविवारी रात्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील वातावरण ढगाळ होते. त्यातच पाऊसही पडला. पण फटाक्यांचा जोर कमी झाला नाही. ढगाळ वातावरणामुळे माईश्चर जास्त होते. हवा अजिबात नव्हती. त्यामुळे फटाका फुटल्यानंतर प्रदूषण एकाच जागी स्थिरावले. रात्रीला थंडी पडल्यामुळे धुक्यासारखे वातावरण झाले. फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाला वातावरणाबाहेर पडता आले नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये जसे स्मॉगसारखे वातावरण असते, तसा अनुभव नागपूरकरांना सोमवारी पहाटे आला. आणि ते घातक ठरले.
केंद्रीय प्रदूषण विभागाने सिव्हिल लाईन्सचा प्रदूषणाचा डेटा घेतला आहे. सिव्हिल लाईन्समध्ये एअर क्वॉलेटी इंडेक्स ३५३ वर आढळला. तसा सिव्हिल लाईन्स परिसर पर्यावरण पूरक परिसर आहे. झाडे मोठ्या प्रमाणात आहे. मोकळा परिसर आहे. फटाकेही येथे फार कमी फुटतात. अशातही प्रदूषणाची ही अवस्था आहे. इतवारी, महाल, गांधीबाग, सीताबर्डी या भागात प्रदूषणाची लेव्हल नक्कीच वाढले असेल.- कौस्तुभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हीजिल फाऊंडेशन