नागपूर : वायु गुणवत्ता निर्देशांक २६० वर : महाल, रामनगरातील हवा खराब नागपूर दिवाळी उत्सवाच्या उत्साहात लाेकांनी फटाक्यांची जाेरात आतषबाजी केली. त्याचे परिणामही दिसून येत आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूरच्या प्रदूषणाचा निर्देशांक सरासरी २६० एक्यूआयवर पाेहोचला. विशेष म्हणजे महाल व रामनगर परिसरात प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक नाेंदविण्यात आला.
दिल्ली, मुंबईप्रमाणे नागपूरचे वातावरणही प्रदूषित हाेत आहे. हिवाळ्याच्या काळात त्यात अधिक वाढ हाेते. दिवाळीमध्ये ते धाेक्याच्या पातळीच्या वर जाते. वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ० ते ५० वर असेल तर श्वास घेण्यास चांगला असताे. ताे ५१ ते १०० पर्यंत गेला तरी समाधानकारक असताे. एक्यूआय १००च्या वर गेल्यास ज्येष्ठ नागरिक, आजारी व दमा रुग्णास श्वास घेण्याचा त्रास वाढताे आणि २००च्या वर गेल्यास प्रदूषित व ३००च्यावर गेल्यास अत्याधिक वाईट मानला जाताे. नागपुरात नाेव्हेंबर सुरू झाल्यापासून निर्देशांक १५० ते २०० च्या स्तरावर आहे. दिवाळी सुरू झाल्यापासून २०० एक्यूआयच्या जवळपास पाेहोचला आहे. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या रात्री लाेकांनी जाेरात फटाके फाेडले आणि एक्यूआय २६० च्या धाेकादायक स्तरावर पाेहोचला. सकाळ हाेईपर्यंत २५० च्या आसपास हाेती. हा स्तर प्रदूषित मानला जात असून दमा राेगी, आजारी व्यक्ती व ज्येष्ठांसाठी धाेकादायक मानला जाताे.
प्रशासनाने रात्री ८ ते १० वाजतापर्यंत फटाके फाेडण्यास परवानगी दिली हाेती, मात्र फटाक्यांची आतषबाजी रात्री १२ पर्यंत सुरू हाेती. सायंकाळी ६ वाजतापर्यंत २३३ वर असलेला एक्युआय रात्री १ वाजतापर्यंत २६० वर पाेहचला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) द्वारे शहरातील चार केंद्रावरून घेतलेल्या आकडेवारीवरून महाल केंद्रावर रविवारी रात्री १२ वाजता सर्वाधिक २६० एक्युआयची नाेंद झाली. महाल केंद्रावर साेमवारी १३ नाेव्हेंबर राेजीही प्रदूषणाचा स्तर २५० एक्युआयच्या आसपास हाेता. रामनगर, सिव्हील लाईन्स व अंबाझरी केंद्रावर रात्री १२ वाजता अनुक्रमे १९९, २०७ व २२० हाेता. हा स्तर १३ नाेव्हेंबरच्या सकाळपर्यंत कायम हाेता.
ग्रीन फटाक्यांच्या नावाने विकले साधे फटाके
मिळालेल्या माहितीनुसार बाजारात सामान्य फटाकेसुद्धा ग्रीन फटाक्यांच्या नावाने विकले गेले. महापालिकेने ग्रीन फटाके फाेडण्याचे आवाहन नागरिकांना केले हाेते. मात्र याचा प्रभावही दिसून आला नाही. तज्ज्ञांच्या मते ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषण ३० टक्के कमी हाेते, म्हणजे ७० टक्के प्रदूषणास कारणीभूत ठरतातच.