नागपूर : नियुक्तीच्या काही दिवसांनंतरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नवनवे किस्से चर्चेला येत आहेत. आता त्यांचा पुण्यात नियुक्त होण्यापूर्वीचा एक किस्सा चर्चेला आला आहे. त्यांनी आपली पहिलीच परिक्षाविधीन नियुक्ती टोलवून पुणे पदरात पाडून घेतल्याची माहिती पुढे आली आहे.सनदी (आयएएस) अधिकारी मितभाषी असतो, असा सर्वसाधारण समज आहे. लाखो लोकांच्या समस्येचे निराकरण आणि त्यांच्या हिताच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यावर असते. त्यामुळे त्याची निवड करताना तो मुद्दाही 'कसाैटी'वर परखला जातो. परंतू, पूजा खेडकर प्रचंड अट्टहासी, आक्रमक स्वभावाच्या असल्याचे समोर आले आहे. अनेक अधिकारी नियुक्तीनंतर आपला तोरा दाखवितात. मात्र, पूजा यांनी पहिल्याच नियुक्तीदरम्यान 'स्त्री हट्ट' मांडला अन् तो पूर्णही करून घेतला.
मसुरीत प्रशिक्षण सुरू असतानाच आयएस अधिकाऱ्यांच्या पुढच्या नियुक्तीचे आदेश जारी होत असतात. त्यानुसार, साधारणत: तीन महिन्यांपूर्वी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची भंडारा येथे सहायक जिल्हाधिकारी (परिक्षाविधीन) म्हणून नियुक्ती झाली होती. भंडारा छोटासा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुण्या-मुंबईसारखी नाईट लाईफ, फॅशन किंवा चमकदमक भंडाऱ्यात नाहीच. त्यात राज्याच्या टोकावर असलेले आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेले गोंदिया तसेच गडचिरोली हे दोन्ही जिल्हे भंडारा जिल्ह्याला लागूनच आहेत. त्याचमुळे की काय, खेडकर यांनी भंडारा मुख्यालयी रूजू होण्याचे टाळले. भंडाऱ्यात नियुक्ती नकोच, असा हट्ट मांडून त्यांनी आपला सरकारी सेवेचा पहिलाच नियुक्ती आदेश टोलवला. तो रिवाईज करून घेण्यात यश मिळवले आणि भंडारा ऐवजी त्यांची पुण्यात बदली झाली.
ठोकर लगते ही सब ठिकाणे !स्वभावातील आक्रस्ताळलेपणा आणि चमकोगिरीचा हव्यास जडलेल्या पूजा खेडकर यांचे किस्से चर्चेला आल्यानंतर प्रसार माध्यमात खेडकर यांना प्रसिद्धी मिळाली. या पार्श्वभूमीवर, थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांनीच शासनाकडे स्थानांतरण करण्याची विनंतीवजा मागणी केल्यामुळे खेडकर यांनी पुण्यातून वाशिमला बदली झाली. दोन दिवसांपूर्वी त्या वाशिमला रुजू झाल्या आणि येथे काम करण्यास आपण उत्सूक असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. भंडाऱ्यात मात्र त्यांनी ही उत्सकुता का दाखवली नाही, हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. मात्र, प्रशासकीय वर्तुळात आता टोलवलेल्या पहिल्या नियुक्तीची जोरदार चर्चा आहे.