लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या कोचमध्ये पाणी नसल्याची तक्रार करूनही रेल्वेने कोचमध्ये पाणी भरले नाही. पुढील रेल्वे स्थानकावर पाणी भरू असे सांगून प्रवाशांना गप्प बसविण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन पाचवेळा चेनपुलिंग केली. अखेर कोचमध्ये पाणी भरल्यानंतर ही गाडी तब्बल एक तासाने पुढील प्रवासासाठी रवाना झाली. परंतु यामुळे नऊ रेल्वेगाड्यांना विलंब झाला.रेल्वेगाडी क्रमांक १२९०५ पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या बी २ कोचमध्ये पाणी नव्हते. प्रवाशांनी अकोला रेल्वे स्थानकावर पाणी भरण्याची मागणी केली. परंतु पुढील रेल्वे स्थानकावर पाणी भरू असे त्यांना सांगण्यात आले. बडनेरा रेल्वे स्थानकावरही पाणी भरण्यात आले नाही. त्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले. नागपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी सकाळी ९.५० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली. यावेळी कोचमध्ये पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका प्रवाशांनी घेतली. कोचमधील पाण्याचा व्हॉल्व्ह नादुरुस्त होता. तो दुरुस्त करून कोचमध्ये पाणी भरण्यासाठी तगादा लावला. परंतु पाणी न भरताच गाडी निघाल्यामुळे प्रवाशांनी चेनपुलिंग केली. पाणी भरण्यात येत नसल्याचे पाहून प्रवाशांनी तब्बल पाचवेळा चेनपुलिंग करून गाडी रोखून धरली. अखेर रेल्वे प्रशासनाने या कोचचा व्हॉल्व्ह दुरुस्त करून कोचमध्ये पाणी भरले. त्यानंतर तब्बल एक तासाने १०.५३ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. यामुळे तेलंगणा एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, आझादहिंद एक्स्प्रेस, संघमित्रा एक्स्प्रेससह नऊ रेल्वेगाड्यांना विलंब झाला.
पाण्यासाठी पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 11:13 PM
पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या कोचमध्ये पाणी नसल्याने नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन पाचवेळा चेनपुलिंग केली.
ठळक मुद्देपाचवेळा केली चेनपुलिंग : नऊ गाड्यांना झाला उशीर